Belagavi

राज्यात वर्षाला 100हुन अधिक पोलीस ठाण्यांच्या इमारती : बोम्मई

Share

राज्यात वर्षाला 100हुन अधिक पोलीस ठाण्यांच्या इमारती बांधण्यात येत आहेत. पोलीस गृहनिर्माण महामंडळाकडून संपूर्ण राज्यात चांगले काम सुरु आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांसाठी सुमारे 2500 घरे बांधण्यास सुरुवात केली आहे अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

बेळगाव शहर पोलीस आयुक्तालयाच्या नवीन कार्यालयाचे आज बुधवारी सकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यानंतर बोलताना बोम्मई म्हणाले, राज्यात 116 पोलिस ठाणी उद्घाटनाच्या टप्प्यात आहेत. एका वर्षात शंभरहून अधिक पोलीस ठाण्यांच्या इमारती निर्माण होण्याची कर्नाटकच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे. पोलीस खात्याला अधिक गतिशील करण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पात 50 कोटी रुपये निधी दिला आहे. त्यातून 300 जीप, स्कॉर्पिओ खरेदी करत आहोत. आगामी काळात सर्व डीवायएसपींसाठी स्कॉर्पिओ वाहन देण्यात येईल. पोलीस कल्याण योजनेत आम्ही सर्व कल्याणकारी कार्यक्रम करत आहोत.

राज्याचा गृह विभाग सक्षमपणे काम करत आहे. कोणत्याही घटनेला सामोरे जाण्याचे सर्व अधिकार गृहखात्याकडे आहेत. कर्नाटक पोलीस हे संपूर्ण देशातील सर्वोत्तम पोलीस दल आहे. केवळ सीमेवर ताकद दाखवणे नाही तर लोकांच्या संपर्कात राहणे हे एक चांगले काम आहे. लोकांशी नेहमी जवळीक साधून त्यांच्या समस्या सोडविणाऱ्या बेळगाव पोलिसांचे मी अभिनंदन करतो.

राज्यभर काही ठिकाणी तोडफोडीच्या घटना सुरू आहेत. अशी विध्वंसक कृत्ये टाळण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करत, त्वरीत अटक करणे आवश्यक आहे. मी गृहमंत्री असताना तर असा कोणताही कार्यक्रम झाला की २४ तासांच्या आत आरोपींना अटक करून शिक्षा व्हायची. कारागृहासह पोलिस विभागाची सर्व कामे आणि सर्व कामे पोलिस गृहनिर्माण महामंडळाला देण्यात येणार आहेत. एक-दोन कारागृहे सुरु करायची आहेत, ती तुम्हीच करा, आम्हाला मात्र बोलवू नका असा विनोदी फटका त्यांनी मारला.

प्रारंभी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना बेळगाव पोलीस आयुक्तालयातर्फे मानवंदना देण्यात आली. त्यानंतर बोम्मई यांनी फीत कापून व कोनशिला अनावरण करून बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या नूतन इमारतीचे उदघाटन केले.

या कार्यक्रमाला गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, मंत्री गोविंद कारजोळ, खासदार मंगल अंगडी, आमदार अनिल बेनके, पोलीस महासंचालक प्रवीण सूद, गृह विभागाचे उपमुख्य सचिव रजनीश गोयल आदी उपस्थित होते.

Tags: