बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यास एल अँड टी कंपनीला 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या अवधीत समस्या दूर न झाल्यास कंपनीवर सरकार योग्य ती कारवाई करेल अशी माहिती नगरविकास मंत्री बैरती बसवराज यांनी आज विधानसभेत दिली.
बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्येवर आज विधानसभेत शून्य प्रहरात चर्चा झाली. जगदीश शेट्टर यांनी हा प्रश्न उपस्थित करताना एल अँड टी कंपनीच्या कारभारावर ताशेरे ओढून कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये घालण्याची मागणी केली. पूर्वी या तिन्ही शहरांना पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी कर्नाटक नागरी पाणी पुरवठा व निस्सारण मंडळाकडे होती. तेंव्हा काही समस्या नव्हती. पण एल अँड टी कंपनीला ही जबाबदारी दिल्यानंतर सहा महिन्यातच समस्या सुरु झाली. जिथे 24X7 पाणी पुरवठ्याची व्यवस्था आहे तो 30% भाग वगळता उर्वरित ठिकाणी 8-10 दिवसातून एकदा पाणी पुरवण्यात येत आहे. त्यामुळे लोक संतप्त होऊन रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. अभय पाटील यांच्याशी मी बोललो, यांनीही बेळगावात सुद्धा हीच परिस्थिती असल्याचे सांगितले. कलबुर्गीमध्येही हेच चित्र आहे. त्यामुळे एल अँड टी कंपनीला नीट काम करणार की नाही हे खडसावून विचारा अन्यथा ब्लॅक लिस्टमध्ये टाकून पाणीपुरवठा मंडळाला पूर्वीप्रमाणे पुरवठ्याची जबाबदारी सोपवा अशी मागणी त्यांनी केली.
या चर्चेत सहभागी होताना बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील म्हणाले, दीड वर्षांपासून बेळगावात पाणी पुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीला देण्यात आली आहे. तेंव्हापसूनच पुरवठ्यात व्यत्यय येत आहे. अनेक ठिकाणी विशेषतः उपनगरात कंपनीने जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते नीट बुजविलेदेखील नाहीत. कंपनीला दंड ठोठावून देखील कार्यपद्धती सुधारलेली नाहीय. अपुऱ्या, अनियमित पाणी पुरवठ्यामुळे बेळगावात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आलीय. त्यामुळे कंपनीला सक्त ताकीद द्या, ब्लॅक लिस्टमध्ये घालून पाणीपुरवठा मंडळालाच पूर्वीप्रमाणेच पुरवठ्याची जबाबदारी द्या अशी मागणी आ. अभय पाटील यांनी केली.
चर्चेला उत्तर देताना नगरविकास मंत्री बैरती बसवराज म्हणाले, लोकांना नियमित पाणी पुरविण्यास सरकार वचब्ध आहे. पाणी पुरवठ्याची स्थिती सुधारण्यासाठी बेंगळूर येथे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाणी पुरवठा मंडळ, एल अँड टी कंपनीचे आणि वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे. या बैठकीत एल अँड टी कंपनीला 15 ते 20 दिवसांत पुरवठा सुरळीत करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे. ती न पाळल्यास सरकार कंपनीवर कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. हवे तर या संदर्भात जगदीश शेट्टर यांच्या अध्यक्षतेखाली हुबळीत आणखी एक बैठक घेऊ असे त्यांनी सांगितले.
एकंदर, बेळगाव, हुबळी-धारवाड आणि कलबुर्गी या तिन्ही शहरातील पाणी पुरवठ्याची समस्या आज विधानसभेत गाजली म्हणावी लागेल.


Recent Comments