निकाल लागेपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करा असे सांगत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज सीमावादावर विधान परिषदेत आपली भूमिका मांडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावत उद्धव ठाकरे म्हणाले, आज मुख्यमंत्री सांगताय की सीमावादावरून आम्ही लाठ्या खाल्ल्या आहेत. तुम्ही काय आम्हाला सांगता? मात्र, आजही सीमावादावरून लाठ्याच खायच्या का?, असा सवाल केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आज विधिमंडळात सीमावादाचा महत्त्वाचा मुद्दा मांडला जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. शिदेंना दिल्लीत जाण्याची गरज काय होती? कारवार, निपाणी, बेळगावला मी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र असे म्हणेन आणि जोपर्यंत सीमावादाच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही. तोपर्यंत सीमाभाग केंद्रशासित प्रदेश करा, असाच ठराव आपण दोन्ही सभागृहात मंजूर करुन तो केंद्र सरकारला पाठवावा. तसेच, सीमाभागातील ज्या ग्रामपंचायतींनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे, त्या ग्रामपंचायतींना राज्य सरकार बरखास्त करणार का?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.
विधानसभेत ठराव का आणत नाही?- अजित पवार
विधानसभेत आज विरोधी पक्षनेते अजित पवार यानी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरले. विधानसभेत अद्यापही सीमावादाचा ठराव का मांडला नाही?, असा सवाल अजित पवारांनी केला. अजित पवार म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून सीमावादाचा मुद्दा जाणीवपूर्वक चिघळवला जात आहे. आज सीमावादावर विधानसभेत ठराव मांडला जाईल, अशी माहिती होती. मात्र, अद्यापही तसा प्रस्ताव किंवा ठराव पटलावर असल्याचे दिसत नाही.
माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही सीमावादावरून महाराष्ट्र सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली. पृथ्वीराच चव्हाण म्हणाले, कर्नाटकात आता विधानसभा निवडणुका असल्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून जाणीवपूर्वक हा वाद पेटवला जात असल्याचे दिसत आहे. मात्र, महाराष्ट्र सरकारने यावर बघ्याची भूमिका घेऊ नये. सीमावादावर सरकारने विधानसभेत ठराव मांडावा. या ठरावाला विरोधकांकडून पाठिंबा देण्यात येईल.


Recent Comments