Banglore

खऱ्या अर्थाने सुशासन देणारे वाजपेयी हे पहिले पंतप्रधान : बोम्मई

Share

स्वातंत्र्यानंतर देशाला खऱ्या अर्थाने सुशासन देणारे, स्वरक्षणात देशाला समर्थ बनविणारे अटलबिहारी वाजपेयी हे पहिले पंतप्रधान होते. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वाना सदाकाळ प्रेरणादायी आहे असे उद्गार मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काढले.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या 98व्या जयंतीनिमित्त आज अटल व्हिजन फौंडेशन आणि कर्नाटक वर्किंग जर्नालिस्ट असोसिएशनने आयोजित केलेल्या स्पिरिट ऑफ इंडिया कार्यक्रमाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्घाटन केले. यावेळी त्यांनी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले.

त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, स्वातंत्र्यानंतर अजातशत्रू अशी बिरुदावली जर कोणत्या पंतप्रधानांना मिळाली असेल तर ती वाजपेयी यांना. सगळ्यांवर प्रेम, आदर करणारे, सगळ्यांना विश्वासात घेऊन जाणारे त्यांचे व्यक्तिमत्व होते. आपल्या खंडप्राय देशाचा कारभार त्यांनी समर्थपणे चालवला. युती सरकार शिताफीने चालवले. सभागृहात बहुमत होणार नाही हे समजताच हिंमतीने राजीनामा देऊन जनादेशासाठी जनतेसमोर जाण्याचे धाडस त्यांनी दाखविले. अनेक नव्या योजना आणून नवभारताच्या उभारणीसाठी योगदान दिले. पोखरण अणुचाचणी करून त्यांनी व तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी स्वरक्षणासाठी देशाला अण्वस्त्रसज्ज केले. सर्व शिक्षण अहियानच्या माध्यमातून वाजपेयी यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल केले असे बोम्मई यांनी सांगितले.

बोम्मई पुढे म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी आणि स्वामी विवेकानंद यांच्यापासून प्रेरणा घेऊन राज्य सरकारने विवेक मिशनच्या माध्यमातून 8 हजार वर्गखोल्या बांधण्याचा निर्णय घेतला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात आयटीबीटी क्षेत्रात धाडसी निर्णय घेऊन क्रांती केली. त्याचेच फलित म्हणून आज या क्षेत्राचा मोठा विस्तार झाल्याचे पहायला मिळते. त्यांचे सर्वसमावेशक राजकारण, विचार, तत्वे लोकशाहीच्या उत्कर्षासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारानेच पुढे जाण्याचा संकल्प आज त्यांच्या जयंतीनिमित्त करूया असे मुख्यमंत्र्यानी सांगितले.

यावेळी महसूल मंत्री आर. अशोक, खा. तेजस्वी सूर्या, आ. कृष्णप्पा, ज्येष्ठ अभिनेते अनंतनाग, कर्नाटक राज्य कार्यरत पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवानंद तगडूरू, पत्रकार अनंत चिनीवार, रवींद्र भट आदी उपस्थित होते.

Tags: