कोविड संदर्भात मी आरोग्यमंत्री आणि आरोग्यखात्याची एक बैठक घेतली आहे. लोकांनी घाबरून जाऊ नये, पण गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्यासह आवश्यक काळजी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.
हुबळी येथे आज शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, कोविड संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या बैठकीत सुचविल्यानुसार राज्यात आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. बूस्टर डोस देण्यास प्राधान्य देण्यात येईल त्यासाठी ग्रापं, तापं पातळीवर शिबिरे घेण्यात येतील. कोविड चाचण्या वाढवण्याची सूचना केली आहे. विमानतळांवर तपासण्या करण्यात येतील. उद्या महसूल मंत्री आर. अशोक, आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर विधानसौधमध्ये बैठक घेणार असून, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करतील. मी आरोग्यमंत्र्यांना आधीच सज्ज राहण्याच्या सूचना केल्या आहेत. केवळ हॉस्पिटलच नव्हे तर औषधे, ऑक्सिजन प्लांट सज्ज ठेवण्यास सांगितले आहे. लोकांनी काळजी करण्याची गरज नाही, पण आवश्यक खबरदारी घ्यावी.
उत्तर कर्नाटकच्या प्रश्नांवर सभागृहात अपेक्षित चर्चा झालेली नाही. म्हादई, कृष्णा प्रकल्पांसह अन्य मुद्द्यांवर किमान दोन-तीन तरी दिवस चर्चा व्हायला हवी, येत्या सोमवारी किंवा मंगळवारी चर्चा करण्यात येईल. या विषयावर मी सभापतींशी चर्चा केली आहे असे बोम्मई म्हणाले. मुदतपूर्व निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आमचा पक्ष किंवा सरकारच्या पातळीवर तरी मुदतपूर्व निवडणुकीची चर्चा झालेली नाही. आम्ही राबवलेल्या लोक कल्याणकारी प्रकल्पांचे रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेसमोर मांडण्याचे काम आम्ही करत आहोत. मात्र काँग्रेस नेत्यांना असुरक्षित वाटत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी, भांडू नका एकसंघ रहा, मुदतपूर्व निवडणूक होणार आहे असे समजावण्यासाठी ते अशी वक्तव्य करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Recent Comments