Belagavi

एडीजीपीनी घेतली समिती-करवे नेत्यांची एकत्रित बैठक

Share

बेळगावच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक एडीजीपी अलोककुमार यांच्या नेतृत्वाखाली आज पार पडली. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असल्याने अंतिम निकाल लागेपर्यंत दोन्ही बाजूनी शांतता, सुव्यवस्था राखून प्रशासन आणि पोलीस खात्याला सहकार्य करण्याचे आवाहन अलोककुमार यांनी यावेळी केले.

एडीजीपी अलोककुमार यांनी आज शुक्रवारी सकाळी टिळकवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र एकीकरण समिती आणि कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक घेतली. सीमाप्रश्नावरून वरच्या पातळीवर काय चालते ते चालू द्या, पण बेळगावात शांतता राखणे हे आपले कर्तव्य आहे. सुप्रीम कोर्टात सीमाप्रश्नाच्या खटल्याचा निकाल लागेपर्यंत सीमाभागात शांतता राखण्याचे आवाहन केंद्रीय गृहमंत्र्यांनीही केले आहे. त्यामुळे विनाकारण बसेसवर दगडफेक करणे, काळे फासणे असे गैरप्रकार दोन्ही बाजूनी न करता शांतता राखावी असे आवाहन अलोककुमार यांनी केले.


यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून लोकशाही मार्गानेच आंदोलने होतात. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांची कर्नाटक सरकारकडून पायमल्ली केली जाते, त्याच्या निषेधार्थ आणि भाषिक अल्पसंख्यांक म्हणून मिळणारे हक्क, सुविधा आम्हाला द्यावे यासाठीच ही आंदोलने केली जातात असे स्पष्ट केले.

यावेळी पोलीस आयुक्त बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडादी, एसीपी चंद्रप्पा, पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी, तालुका समितीचे सचिव ऍड. एम. जी. पाटील, माजी नगरसेवक रणजित चव्हाण-पाटील तसेच करवे व कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: