Belagavi

कारजोळ यांच्याकडून आमदाराचा एकेरी उल्लेख : विधानसभेत रणकंदन

Share

राज्यात बससेवेचा बोजवारा उडाल्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत आज चांगलेच रणकंदन माजले. सत्ताधारी आणि विरोधी पक्ष सदस्यांची परस्परविरोधी घोषणाबाजी, विरोधी काँग्रेस सदस्यांचे धरणे यामुळे सभागृह दोनवेळा तहकूब करावे लागले.

राज्यात बससेवेचा बोजवारा उडाल्यामुळे जनतेचे विशेषतः शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. या मुद्द्यावरून आज विधानसभेत मोठा गदारोळ झाला. प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे सिद्धू सवदी यांनी हा प्रश्न उपस्थित केला. जमखंडी मतदारसंघातील तेरदाळ, रबकवी, महालिंगपूर आदी भागात अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एक-एक तास बससाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांना शाळा-कॉलेजात वेळेवर पोहोचता येत नाही याकडे त्यांनी लक्ष वेधले. सुमारे १५ आजीमाजी आमदार, लोकप्रतिनिधी असूनही जमखंडीहून बेंगळूरला थेट बससेवा नाही असे त्यांनी सांगितले.

त्यावर उत्तर देताना परिवहन मंत्री बी. श्रीरामुलू यांनी, तेरदाळ विभागात ८२ बस असून, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून माहिती घेऊन सुविधा आणि आणखी बसेस पुरवण्यात येतील असे उत्तर दिले.  यावेळी बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आर. व्ही. देशपांडे यांनी, केवळ बस पुरवून काय फायदा?, पुरेसे चालक, वाहक नाहीत, चांगले रस्ते, बसस्थानके नाहीत. ती देऊन बससेवा सुरळीत करण्याची मागणी केली.

त्यावर कोविडच्या आधी बससेवा सुरळीत सुरु होती. काही ठिकाणी चांगले रस्ते नसल्याने बसेस गावांपर्यंत जाऊ शकत नाहीत. माहिती घेऊन सर्व सुविधा पुरवू असे श्रीरामुलू यांनी सांगितले. मात्र त्यांच्या उत्तराने समाधान न झालेल्या सदस्यांनी आक्रमक होत तावातावाने आपापल्या मतदार संघातील समस्या मांडण्यास सुरवात केली. खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनीही मतदार संघातील बसची समस्या मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी गलका सुरु झाला. काही काँग्रेस सदस्यांनी सभापतींपुढील हौद्यात धाव घेतली. त्यावर सभापती कुमार बंगारप्पा यांनी सदस्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान काँग्रेस आमदार कृष्णा बैरेगौडा यांनी, या विषयावर अर्धा तास चर्चेला परवानगी देण्याची सूचना केली. त्यावर मंत्री श्रीरामुलू यांनी, राज्यातील चारही परिवहन विभागातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या ऐकून त्या सोडविण्यात येतील असे सांगितले. चारही परिवहन विभागात एकूण २ हजार बसचालक नेमण्यात येणार आहेत. त्यांना प्रशिक्षण काळात सध्याच्या १० हजार ऐवजी २० हजार वेतन देण्यात येणार आहे असे सभागृहाला सांगितले.

परिवहन मंत्र्यांच्या उत्तरानंतरही सदस्यांनी सविस्तर चर्चेची मागणी करत हौद्यात धरणे सुरूच ठेवले. त्यावेळी जलसिंचन मंत्री गोविंद कारजोळ यांनी एका विरोधी सदस्याला उद्देशून ‘ए जा इथून, जागेवर जाऊन बैस’ असे एकेरी भाषेत सुनावल्याने विरोधी सदस्य पुन्हा आक्रमक होत घोषणा देऊ लागले. या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या आणि कारजोळ यांच्यात जुंपली. ‘अशी गुंडगिरी चालणार नाही, सर्वांना समान हक्क, गौरव आहे, सन्मानाने बोला’ अशा शब्दांत सिद्दरामय्यांनी कारजोळ यांना सुनावले. या दरम्यान सभागृहात उभय पक्षांत गोंधळ माजल्याने सभापती कुमार बंगारप्पा यांनी सदन १० मिनिटांसाठी तहकूब केले.

कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर पुन्हा गोंधळाचीच परिस्थिती निर्माण झाली. कायदा व संसदीय व्यवहार मंत्री माधुस्वामी यांनी, परिवहन मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. सरकार राज्यातील बससेवा सुरळीत करण्यासाठी पावले उचलेल असे सांगितले.  त्यानंतर सभापतींनी हा विषय इथेच संपवूया, चर्चेसाठी दुसरे मुद्दे घेऊया असे सांगितले. परंतु दोन्हीकडचे सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. या दरम्यान सिद्दरामय्या यांनी, राज्यात बससेवेचा बोजवारा उडाला आहे, सरकार गांभीर्याने घेत नाही असा आरोप केला. मी जिथे जाईन तेथे लोक अपुऱ्या बसेसची तक्रार मांडतात. पुरेसे चालक नाहीत, बस नाहीत, रस्ते नाहीत ही गंभीर स्थिती आहे. ती सुधारण्याची गरज आहे. कारजोळ वरिष्ठ मंत्री आहेत, दुसऱ्यांना उपदेश करतात, मात्र स्वतः दुसऱ्यांचा अपमान करतात. सभागृहात कामकाज सुरळीत चालवायचे ही सत्ताधारी पक्षाची जबाबदारी आहे असा टोला हाणला. समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत धरणे मागे घेणार नाही असे त्यांनी सांगितले.

त्यावर कायदा मंत्री माधुस्वामी यांनी, परिवहन मंत्र्यांनी अतिशय स्पष्ट सांगितले आहे. चारही विभागांचे प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली आहे. यावर सभापतींनीही चर्चेची संधी देतो म्हटलेले आहे. आम्ही कोणाचा अपमान केलेला नाही. वास्तविक हा विषय जनहितासाठी आमच्याच सदस्यांनी उपस्थित केला आहे, तुमच्या नव्हे’ असे सांगताच सभागृहात पुन्हा गोंधळ उडाला. सिद्दरामय्या यांनी कारजोळ यांनी दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली. दोन्ही पक्षांकडून यावर जोरदार घोषणाबाजी सुरु झाली. सत्ताधारी सदस्यही आक्रमक होत हौद्याकडे धावून आले. ‘काँग्रेसवाले चोर है’ अशी घोषणाबाजी त्यांनी सुरु केली. काँग्रेस सदस्यांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले. या दरम्यान दुसऱ्यांदा सभागृह तहकूब करण्यात आले. नंतर पुन्हा कामकाज सुरु झाल्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी सभागृहात निवेदन केले. कर्नाटक विधिमंडळाला एक चांगली परंपरा आहे. राज्याचे, लोकांच्या कल्याणाचे मुद्दे मांडून चर्चा केली पाहिजे, चर्चा यशस्वी झाली तरच चांगले निर्णय घेता येतील असे त्यांनी सांगितले.

त्यावर सिद्दरामय्या यांनीही, चर्चेच्या ओघात काहीवेळा आक्रमक होणे स्वाभाविक आहे. परंतु दुसऱ्या सदस्यांचा अवमान होऊ देता कामा नये असा टोला हाणला.
एकंदर, विधानसभेत अपुऱ्या बससेवेचा मुद्दा आज चांगलाच गाजला.

Tags: