Belagavi

वंचितांना आरक्षण देण्यासाठी भाजप वचनबद्ध : सी. टी. रवी

Share

कर्नाटकातील वंचितांना, उपेक्षितांना आरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजप, आमचे सरकार आणि मुख्यमंत्री वचनबद्ध आहेत. त्यांनी ते कृतीतून दाखवून दिले आहे असे भाजप राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी यांनी सांगितले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावात आज बुधवारी सकाळी एका खासगी हॉटेलात प्रसारमाध्यमांशी बोलताना सी. टी. रवी म्हणाले, वचनबद्धता असेल तर सगळे शक्य आहे. वंचितांना सामाजिक न्याय देण्यासाठी भाजप, सरकार आणि मुख्यमंत्री वचनबद्ध आहेत. याआधी विरोधी पक्षांची सरकारे असताना वर्षानुवर्षे एससी-एसटी आरक्षणाच्या मुद्द्याला कोणी हात लावला नव्हता. पण बोम्मई सरकारने त्यांचे आरक्षण वाढवून वचनबद्धता सिद्ध केली आहे. न्यायोचित पद्धतीने हे सगळे करण्यात आले. पंचमसाली, कुरुबा, मादिगसह राज्यात अनेक समुदाय आरक्षणासाठी लढा देत आहेत. आता सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती नेमली आहे. तिच्या अहवालानंतर सरकार योग्य निर्णय घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र विधिमंडळात मुख्यमंत्री बोम्मई यांचा कथित अवमान झाल्याबाबतच्या प्रश्नावर बोलताना रवी म्हणाले, अशा गोष्टींनी मुख्यमंत्र्यांचा एक टक्क्यानेही अनादर झालेला नाही. कर्नाटक-महाराष्ट्रात हजारो वर्षांपासून सौहार्दाचे संबंध आहेत. ते कायम राखण्याची गरज आहे. दोन्ही भाषिकांनी एकमेकांची संस्कृती समृद्ध केली आहे. नुकतेच मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात त्यांचे भाषण ऐकले. त्यावेळी मला दोन्ही भाषांतील तब्बल 53 शब्द समसमान आढळून आले. मराठी भाषिक असलेल्या द. रा. बेंद्रे यांनी कन्नड साहित्य समृद्ध केले आहे. कर्नाटकात कोकणी अकादमी, कोडगू, लंबाणी अकादमी, मराठा समाज प्राधिकरण आहे. दोन्ही राज्यांचे एकमेकांशी स्नेहाचे, सौहार्दाचे संबंध आहेत. ते अधिक दृढ करणे गरजेचे आहे असे सी. टी. रवी यांनी सांगितले.

एकंदर, कर्नाटक-महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील पुरातन संबंध, सौहार्द अधिक दृढ करण्याची गरज सी. टी. रवी यांनी व्यक्त केली.

Tags: