मराठा समाजाला ३ बी मधून २ ए मध्ये आरक्षण देऊन , सकल मराठा समाजाचा सर्वांगीण विकास साधावा या मागणीसाठी , बेळगावमधील कोंडसकोप्प येथे मराठा समाजाच्या वतीने भव्य आंदोलन छेडण्यात आले . अनेक राजकीय नेत्यांनी मराठा समाजाच्या या आंदोलनास पाठिंबा दर्शवला .
राज्यभरातील मराठा समाजाला आर्थिक ,सामाजिक तसेच शैक्षणिक उन्नतीसाठी २ ए मध्ये आरक्षण मिळावे यासाठी आज अधिवेशनादरम्यान बेळगावमधील कोंडसकोप्प येथे भव्य आंदोलन छेडण्यात आले . अनेक वर्षांपासून ह्या आरक्षणाची मागणी आहे . या मागणीच्या पूर्ततेसाठी बंगळूरच्या गवीपूर मठाचे मंजुनाथ स्वामीजींच्या नेतृत्वाखाली आयोजित आंदोलनाला हजारोंच्या संख्येने मराठा जनसमुदाय उपस्थित होता . अनेक राजकीय नेत्यांनी या आंदोलनाला भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला .काँग्रेसच्या आ . लक्ष्मी हेब्बाळकर , आ . सतीश जारकीहोळी ,, आर व्ही देशपांडे , सिद्धू सवदी , आ . अभय पाटील, आ. अनिल बेनके , श्रीमंत पाटील यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला .

मराठा समाजाचे नेते तसेच भाजपचे ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी यावेळी सांगितले कि , मराठा समाज हा राज्यात आर्थिक,शैक्षणीक , सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या मागासलेला असून ,त्यासाठी आम्ही पाच वर्षांपासून , या समाजाचा 3 बी मधून २ ए मध्ये समावेश करण्यासाठी लढा देत आहोत . सरकारने आमची मागणी पूर्ण करून , मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यायला हवे असे ते म्हणाले . आ . लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे सांगितले . मराठा समाजाबद्दल आपल्याला खूप आदर आहे . ग्रामीण क्षेत्रात आपण या समाजासाठी खूप करीत आहात . तुमची ही मागणी आम्ही सरकारपर्यंत पोचवू असे त्या म्हणाल्या .

या नंतर आ . सतीश जारकीहोळी भाषणासाठी उभे राहिले असता त्यांना उपस्थितांपैकी काहींनी मज्जाव केला . यावेळी मोठा गोंधळ उडाला . आंदोलकांनी जय भवानी ,जय शिवाजी असा जयघोष यावेळी सुरु केला . यावेळी जारकीहोळी म्हणाले कि , कुठेही गेलात तरी विरोध हा राहणारच . काहीजण हे राजकारण करतात , राजकीय जीवनात हे नवीन नाही . आम्ही सदैव मराठा समाजासोबत राहू असे ते म्हणाले . यावेळी मंजुनाथ स्वामीजी म्हणाले कि , बेळगावच्या विधानसौधसमोर शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावा , त्याचप्रमाणे मराठा समाजाला २ ए मध्ये आरक्षण द्यावे यासंबंधी आम्ही या आधी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत . सरकारने त्वरित याबद्दल निर्णय घ्यावा .
शामसुंदर गायकवाड , माजी आ . मनोहर कडोलकर , नागेश मन्नोळकर , धनंजय जाधव , विनय कदम , प्रवीण पाटील आदींसह हजारोंच्या संख्येने मराठा बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते .


Recent Comments