Belagavi

जमावबंदीच्या आदेशामुळे प्रथमच म. ए . समितीच्या महामेळाव्याची परंपरा खंडित : समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड

Share

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शहरातील टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आज सोमवारी सकाळी , मराठी भाषिकांच्या महामेळाव्यासह आयोजन करण्यात आले होते . या मेळाव्यास उपस्थित राहण्यास महाराष्ट्रातील नेत्यांना मज्जाव करण्याबरोबरच ऐनवेळी या मेळाव्याची परवानगी रद्द करून आज सकाळी पोलिसांनी व्हॅक्सिन डेपो मैदानावर समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड केली . दरवर्षी अधिवेशनाला विरोध दर्शवण्यासाठी , आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळावा प्रथमच खंडित झाल्याने , मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे .

समितीच्या नेत्यांनी , टिळकवाडी पोलीस स्थानकामध्ये अर्ज देऊन , रीतसर परवानगी मागितली होती . मात्र कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीने , बेळगाव जिल्हा प्रशासनाकडून व्हॅक्सिन डेपो मैदानापासून 500 मीटर अंतरापर्यंत 144 कलम लागू करण्यात आले आहे . त्यामुळे मैदानाच्या ठिकाणी जाण्यास कोणालाही परवानगी केली जात नव्हती . मैदानाच्या ठिकाणी जाणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत .फक्त माध्यम प्रतिनिधी आणि पोलिसांना या ठिकाणी प्रवेश दिला जात होता.

सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी तसेच कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा दरवर्षी या ठिकाणी घेण्यात येतो . सोमवारी सकाळी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर ह्या मेळाव्याची तयारी देखील करण्यात आली होती . मात्र अचानक प्रशासनाने परवानगी नाकारल्याने आणि या भागात जमावबंदीचा आदेश लागू केल्याने , समिती कार्यकर्त्यांनी मेळाव्यासाठी घातलेला मंडप पोलिसांकडून काढण्यात आला .

या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक , एडीजीपी अलोक कुमार यांनी शहर पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी यांच्यासह व्हॅक्सिन डेपो मैदानाला भेट देऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली .

यावेळी त्यांनी या ठिकाणी 144 कलम जारी करण्यात आले आहे . समिती नेत्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात मेळाव्यासाठी परवानगी मागितली होती . पण जमावबंदीचा आदेश असल्याने हा महामेळावा रद्द करण्यात आला आहे . कायदा सुव्यवस्थेचे उल्लंघन केले तर आम्ही कारवाई करूच . मात्र एमईएस कडून महामेळावा घेण्यात आलेला नाही त्यामुळे आम्ही केस केलेली नाही . त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये . सीमेवर देखील 144 कलम लागू करण्यात आले आहे . त्याचे उल्लंघन केल्यास आम्ही निश्चित कारवाई करू.

महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होऊ नये यासाठी समिती नेते माजी आ . मनोहर किणेकर आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन बसमध्ये बसवून एपीएससी पोलीस स्थानकात त्यांना स्थानबद्ध केले आहे.

सीमा भागातील मराठी भाषिकांची महाराष्ट्रात जाण्याची इच्छा प्रकट करण्यासाठी तसेच कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात आतापर्यंत कधी खंड पडला नव्हता . मात्र प्रथमच प्रशासनाच्या जमावबंदीच्या आदेशामुळे हा महामेळावा रद्द झाला आहे . यामुळे मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे .

Tags: