मादिग समाजाला अंतर्गत आरक्षण मंजूर करा अन्यथा विरोधाला सामोरे जा असा इशारा मादिग आरक्षण संघर्ष समितीने दिलाय. हुक्केरी तालुका मादिग समाज आरक्षण संघर्ष समितीच्या “चलो सुवर्णसौध” बाईक रॅलीला आज हुक्केरीत चालना देण्यात आली.

मादिग समाजाला अंतर्गत आरक्षण मिळण्यासाठी गेली तीस वर्षे संघर्ष करण्यात येत आहे. परंतु न्याय देण्याऐवजी मादिग समाजात इतर जाती जोडून मूळ बहुजनांवर अन्याय केला आहे. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मादिग समाजाला अंतर्गत आरक्षण दयावे, अन्यथा येत्या निवडणुकीत मादिग समाजाची ताकद दाखवून देऊ असा इशारा यावेळी विठ्ठल मादार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिला.

शेकडो कार्यकर्त्यांनी जुन्या तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत सरकारकडे मागण्या पूर्ण करण्याची मागणी करत घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना दलित नेते करेप्पा गुडेन्नवर यांनी, बहुजन समाजात इतर जातींचा समावेश करून मूळ बहुजनांची फसवणूक होत असल्याने राज्य सरकारने अंतर्गत आरक्षण जाहीर करावे अन्यथा येत्या काही दिवसांत तुम्हाला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.
यावेळी हुक्केरी मादिग समाज संघटनेचे अध्यक्ष श्रवण बेवीनकट्टी, सचिव मुत्याप्पा मादर, शशिकांत होन्नल्ली, काडेश होसमनी, बंडप्पा मादर, सदानंद बेवीनकट्टी आदी बहुजन समाजाचे नेते उपस्थित होते. यानंतर बेळगाव जिल्ह्यातील मादिग समाजातील तरुणांनी बाईक रॅलीद्वारे बेळगावकडे प्रस्थान केले.


Recent Comments