निसर्गाच्या सान्निध्यात कागदावर विविध प्रकारची दृश्ये रेखाटत भावविश्व साकारणारे चिमुकले हात, त्यांच्या कल्पनाविश्वातून विविध रंगांनी साकारलेली निसर्गाची विविध रूपे आणि त्याकडे थक्क होऊन पाहणारे पालक असे दृश्य बेळगावच्या व्हॅक्सिन डेपोत आज रविवारी पहायला मिळाले. निमित्त होते, बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेचे !
होय, गेल्या सुमारे वीस वर्षांपासून आ. अभय पाटील संपूर्ण बेळगावातील बच्चे कंपनीच्या चित्रकलाविष्कारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने चित्रकला आयोजित करत आहेत. तीच परंपरा पुढे चालवत आज रविवारी सकाळी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपोच्या भव्य मैदानात त्यांनी यंदाच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. निसर्गाच्या सानिध्यात स्वच्छ, शुद्ध वातावरणात हजारो बालक-बालिकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन कलाविष्कार प्रकट केला. पेन्सिल, ब्रशच्या साहाय्याने शुभ्र कागदावर आरेखन करत विविध प्रकारची निसर्गचित्रे, प्राणी, पशू, पक्षी रेखाटताना मुले दंग झाली होती.
या स्पर्धेत प्रथमच सहभागी झालेल्या राणी संतोष अर्कसाली या सेंट जोसेफमध्ये सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आनंद व्यक्त केला. आपली मराठीसोबत बोलताना ती म्हणाले, मी प्रथमच या स्पर्धेत सहभागी झाली आहे. स्पर्धेचे आयोजन खूप चांगले आहे. मला चित्र काढताना खूप मजा येतेय. आमचे बेळगावचे आमदार अभय पाटील यांनी खूप चांगल्या पद्धतीने चित्रकला स्पर्धा आयोजित करून आम्हाला प्रोत्साहन दिले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी गोगटे यांनीदेखील स्पर्धेच्या आयोजनाबाबत प्रशंसा केली. मी प्रथमच या स्पर्धेला भेट दिली. अभय पाटील यांनी नेटक्या पद्धतीने याचे आयोजन केले आहे. निसर्गाच्या सानिध्यात मुले आनंदाने चित्रे काढण्यात दंग झालीत हे पाहून समाधान वाटले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, स्पर्धेच्या आयोजनाबाबत माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, बेळगावच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी गेली अनेक वर्षे आम्ही या स्पर्धेचे आयोजन करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. यंदा 15 हजारहून अधिक मुलांनी स्पर्धेत भाग घेतला आहे. पालकांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी होत आहे. त्यांनी मुलांमधील प्रतिभेला वाव दिला पाहिजे. स्पर्धेला सहकार्य केलेल्या पालक, शिक्षक आणि आपल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.
एकंदर, आजच्या रविवारच्या आल्हाददायक सकाळी, व्हॅक्सिन डेपोच्या निसर्गरम्य वातावरणात झालेल्या आ. अभय पाटील आयोजित चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हजारो मुलांनी या स्पर्धेत सहभागी होऊन सुरेख, सुंदर चित्रे रेखाटून आपला चित्रकलेचा आविष्कार प्रकट केला.


Recent Comments