Banglore

मुख्यमंत्री बोम्मई यांनी घेतले विणकरांच्या समस्यांबाबत महत्वाचे निर्णय

Share

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विणकरांच्या विविध मागण्यांसंदर्भात शनिवारी बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

विणकरांची अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्या आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी बेंगळूर येथे आज मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीत बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील, रामदुर्गचे आ. महादेवप्पा यादवाड, आ. सिद्धू सवदी तसेच संबंधित खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

व्यावसायिक विणकर समुदायाला 50 टक्के अनुदान देण्याची योजना तयार करणे, नेकार सन्मान योजनेचा लाभ यंत्रमागावर काम करणाऱ्या मजुरांना देणे, विणकर वस्तीत राहणाऱ्या विणकरांसाठी भोगवटा प्रमाणपत्र जारी करणे, जे विणकर घरामध्ये विणकाम करतात त्यांना ‘कुटिरोद्योग’ मानून कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सवलत देणारा आदेश जारी करणे, कर्नाटक हातमाग आणि पॉवरलूम कॉर्पोरेशन्सकडून विद्या विकास योजनेंतर्गत आवश्यक असलेल्या गणवेशाचा पुरवठा करण्यासाठी प्रमाण निश्चित करणे आणि उर्वरित प्रमाणासाठी निविदा काढणे, योग्य वेळी पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी डिसेंबरमध्ये कार्यादेश जारी करणे, कर्नाटक हातमाग महामंडळाकडून विविध सरकारी विभागांसाठी लागणारे २५ टक्के गणवेश खरेदी करणे, विणकरांना 2 लाख रुपयांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देणे, तमिळनाडूच्या धर्तीवर 5 एचपीपर्यंतच्या पॉवरलूम विणकर मशीनला आणि प्री युनिट्सना मोफत वीज पुरवठा करणे आणि निश्चित शुल्कामध्ये 50 टक्के सवलत देणे, असंघटित क्षेत्रातील विणकाम युनिटमधील कामगारांच्या समावेशाची तपासणी करणे आणि बांधकाम कामगारांना दिल्या जाणार्‍या सर्व सुविधांचा लाभ विणकरांना देणे आणि याबाबत राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी निर्णय घेणे असे महत्वाचे निर्णय घेण्यात आले.

दरम्यान, बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना जारी केलेल्या व्हिडिओ निवेदनात आ. अभय पाटील यांनी विणकरांची मागण्या मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री बोम्मई यांचे आभार मानले. कर्नाटकाच्या इतिहासातच सर्वप्रथम विणकरांसाठी इतके महत्वाचे कल्याणकारी निर्णय घेण्यात आले आहेत. त्याबद्दल येत्या सोमवारी बेळगावात सुवर्णसौधमध्ये विणकर समाजातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीला वस्त्रोद्योग मंत्री शंकर पाटील-मुनेनकोप्प, केएचडीसीचे अध्यक्ष सिद्धू सवदी, आमदार अभय पाटील, महादेवप्पा यादवाड, माजी आमदार एम. डी. लक्ष्मीनारायण, अतिरिक्त मुख्य सचिव आणि विकास आयुक्त आयएसएन प्रसाद, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एन मंजुनाथ प्रसाद, एमएसएमई विभागाचे सचिव पंकज प्रसाद, कुमार पांडे आणि हातमाग व वस्त्र विकास आयुक्त टीएचएम कुमार इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tags: