Belagavi

ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्थेचे अभय पाटील यांच्याहस्ते उदघाटन

Share

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील संकल्पनेतून बेळगावात पहिली पब्लिक ई सायकल बाईक शेअरिंग

व्यवस्था साकारली आहे. आज शुक्रवारी सकाळी शहापूर येथे या व्यवस्थेचे अभय पाटील यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले.
वेळ, पैसे आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या हेतूने आणि स्वास्थ्यही राखता येईल यासाठी पब्लिक ई सायकल बाईक शेअरिंग व्यवस्था सुरु करण्यात आली आहे. बेळगावात प्रथमच अशा अनोख्या यंत्रणेची सुरुवात करण्यात आली आहे. आ. अभय पाटील यांची ही संकल्पना आहे. त्यांच्याच हस्ते आज शुक्रवारी सकाळी महात्मा फुले रोड येथे या प्रणालीचे पूजन करून उदघाटन करण्यात आले.

या संदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक शेअरिंग सिस्टीम असे या व्यवस्थेचे नाव असून तेथे नागरिकांना माफक दरात सायकली भाड्याने मिळण्याची व्यवस्था केली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात अशी सुमारे 20 स्टेशन्स सुरु करण्यात आली आहेत. तेथे ई पेमेंट पद्धतीने भाडे भरण्याची सुविधा आहे. भाड्याचे दरपत्रकही लावलेली आहेत. पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक या तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी 100 म्हणजेच एकूण 300 ई बाईक असून, जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांची संख्या दुपटीने वाढविण्यात येईल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासह वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी याची नागरिकांना मदत होईल. यासाठी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी स्थानिक नगरसेवक,मनपा आणि स्मार्टसिटीचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: