Belagavi

‘प्लि बार्गेनिंग’ तत्वावर तांब्याच्या तारा चोरणाऱ्या आरोपींना शिक्षा

Share

राज्यात आणि देशातही सर्वप्रथम सहकारी तत्वावर स्थापित झालेल्या हुक्केरी ग्रामीण वीज संघाच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या पाच आरोपींना बेळगाव जिल्हा प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. ‘प्लि बार्गेनिंग’ तत्वावर म्हणजेच आरोपींनी गुन्हा कबूल केल्यानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हुक्केरी, संकेश्वर, यमकनमर्डी पोलीस स्थानकांच्या हद्दीत विविध ठिकाणी हुक्केरी ग्रामीण वीज संघाच्या मालकीच्या ट्रान्सफॉर्मरमधील ऑईल नष्ट करून तांब्याच्या तारा चोरण्याच्या तब्बल ५१ घटना २०१४ मध्ये घडल्या होत्या. त्यामुळे हुक्केरी वीज संघाचे व्यवस्थापन आणि तिन्ही स्थानकांचे पोलिसही चक्रावून गेले होते. हुक्केरीचे तत्कालीन सीपीआय एस. सी. पाटील यांनी पाळत ठेवून होळेम्मा देवस्थानजवळ विश्वनाथ वीरप्पा हुदली, गजानन सिद्दप्पा आलकनुर, काशिनाथ इरेशी गिडमनी, इरप्पा लगमा हुगायी रा. सर्वजण बुगडिकट्टी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर आणि भीमाप्पा कल्लाप्पा नाईक, रा. चिंचेवाडी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर यांना रंगेहात पकडले होते. त्यांच्याकडून तांब्याच्या तारा, दुचाकी आणि चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. याबाबत सरकारी वकील विद्यासागर दरबार यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली.

या प्रकरणी हुक्केरीचे तत्कालीन सीपीआय एस. सी. पाटील, संकेश्वर पीएसआय शशिकांत कांबळे, यमकनमर्डी पीएसआय एम. बी. बिरादार व सहकार्यांनी तपास करून गुन्हा दाखल करून रोख रक्कम आणि वाहने जप्त केली होती.

या खटल्यात सर्व पाच आरोपींनी न्यायालयासमोर शपथपत्र सादर करून त्याद्वारे आपला गुन्हा कबूल केला होता. त्यानंतर सरकारी आणि बचाव पक्षाच्या वकिलांची बैठक चर्चा आदी प्रक्रिया पार पडल्या. त्यानंतर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्वांच्या आधारे बेळगावचे प्रथम अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पवनेश डी. यांनी चार आरोपीना प्रत्येकी २ वर्षे ४ महिने ११ दिवस आणि पाचवा आरोपी भीमाप्पा नाईक याला १ वर्ष २ महिने कारावासाची शिक्षा सुनावली.

या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ऍड. विद्यासागर दरबारे यांनी युक्तिवाद केला. प्ली बार्गेनिंग तत्वावर शिक्षा सुनावण्यात आलेले अलीकडच्या काळातील हे पहिलेच प्रकरण आहे.

Tags: