सध्या समाजात माणुसकी, लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर साहित्यिकांनी समाजात प्रेम, सामंजस्य निर्माण करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावात आज श्री रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्या वतीने आयोजित ग्रामीण मराठी साहित्य संमेलन शानदारपणे पार पडले. यावेळी मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागर करण्यात आला. संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, सध्या धर्मद्वेष, भाषाद्वेष आणि अतिरेकी चंगळवादामुळे संस्कृतीची हानी होत आहे. सामान्य माणूस एका गुंगीत जगत आहे. त्याला जागे करून निर्भय सत्यशोधकाची भूमिका साहित्यिकांनी घेतली पाहिजे. उत्कृष्ट साहित्य निर्मिती ही समाजाची उत्कट प्रतिक्रिया असते. काळजात कळ जेंव्हा कागदावर उमटते तेंव्हाच उत्कृष्ट साहित्याची निर्मिती होते असे ते म्हणाले.

शानदार ग्रंथदिंडी काढून मराठी साहित्य संस्कृतीचा जागर सुरु झाला. गावातील प्रमुख मार्गावरून सजवलेल्या पालखीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरीची संमेलनस्थळापर्यंत दिंडी काढण्यात आली. दिंडीत शालेय विध्यार्थी-विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशात भगवे फेटे परिधान करून भगवा ध्वज आणि राष्ट्रध्वज हाती घेतले होते. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आदी महापुरुषांच्या वेशात दिंडीत सहभागी झालेली मुले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
बेळगुंदी ग्रापं अध्यक्ष हेमा सुभाष हदगल, बिजगर्णी ग्रापं अध्यक्ष मनोहर बेळगावकर, बेळगाव वकील संघटनेचे उपाध्यक्ष सुधीर चव्हाण, उद्योजक प्रतीक गुरव, अशोक गावडा आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संमेलनाचे उदघाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष उद्योजक रामचंद्र पाटील यांनी स्वागत केले. ग्रामदैवत पुजारी नामदेव गुरव आणि अरुण गुरव यांनी श्री रवळनाथ मूर्तीचे पूजन केले. ग्रापं सदस्य राजू किणयेकर, कावळेवाडी ग्रापं सदस्य ऍड. नामदेव मोरे यांनी ग्रंथपूजन केले. यळेबैल ग्रापं सदस्य महेश पाटील, डॉ. नितीन राजगोळकर यांनी पालखीपुजन केले. शिवनेरी पीकेपीएसच्या उपाध्यक्षा रेणुका कंग्राळकर यांनी वीणापूजन, ठेकेदार जे. एम. फगरे यांनी ध्वजपूजन केले. यळेबैलचे निवृत्त सुभेदार धनंजय मोरे यांनी ग्रंथदिंडीला चालना दिली. एपीएमसीचे माजी अध्यक्ष निंगाप्पा जाधव यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन केले. माजी ग्रापं अध्यक्ष शिवाजी बोकडे, मनोहर मोरे यांनी हुतात्मा स्मारकाचे पूजन केले.

यावेळी साहित्यिक पा.ना.कुलकर्णी जन्मशताब्दीवर्ष साहित्य नगरीचे उदघाटन विनय कदम, व्यासपीठ उदघाटन सुरज बेटगेरीकर, भावकवी कृ. ब. निकुंब सभागृह उदघाटन माजी महापौर शिवाजी सुंठकर, साहित्य सरिता अंकाचे प्रकाशन आर. आय. पाटील, आर. एम. चौगुले यांच्या हस्ते झाले. तसेच विविध प्रतिमा पूजन बेळवट्टी ग्राम पंचायत अध्यक्ष म्हाळू मजुकर, विलास बेळगावकर, गिता ढेकोळकर, निंगुली चव्हाण आदींच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना स्वागताध्यक्ष रामचंद्र पाटील म्हणाले , बेळगुंदी गावाला सामाजिक, साहित्यिक, कृषी परंपरा आहे. लोकलढा, चळवळीत नेहमीच सहभाग असतो. सीमाप्रश्नासाठी गावाने हुतात्मे दिलेले आहेत. संमेलनामुळे येथील युवकांना ऊर्जा मिळत आहे. नव्या पिढीला बहुभाषिक झाले पाहिजे. पण आमची संस्कृती व भाषा विसरून चालणार नाही.
संमेलनात ‘साहित्य आणि वर्तमानकाळ’ या विषयावर प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद झाला. त्यात प्रा. दि. बा. पाटील, डॉ. दीपक स्वामी, प्रा. भीमराव धुळूबुळू यांनी सहभाग घेतला. डॉ. अनिता खेबुडकर यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. त्याचे सूत्रसंचालन बेळगावचे कवी बसवंत शहापूरकर यांनी केले. यावेळी अनेक प्रस्थापित व नवोदित कवींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या.
संमेलनाला बेळगाव शहरासह तालुका आणि सीमाभागातील मराठी साहित्यरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकंदर, बेळगुंदी मराठी साहित्य संमेलनात मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीवर विचारमंथन करण्यात आले.


Recent Comments