Belagavi

‘लिंडे’ कंपनीकडून महेश फाऊंडेशनला स्कूलबसची मदत

Share

शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी ‘लिंडे’ अग्रगण्य जागतिक औद्योगिक वायू आणि अभियांत्रिकी कंपनीतर्फे कणबर्गी येथील महेश फौंडेशनला गुरुवारी स्कूलबसची मदत करण्यात आली आहे.

महेश फौंडेशनकडून संस्थेला स्कूलबसची नितांत गरज असल्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. याची दखल घेऊन लिंडे कंपनीने बस उपलब्ध करून दिली आहे. दरम्यान, महेश फौंडेशनमध्ये महिलांसाठी सेवा आणि कौशल्य विकास केंद्र स्थापण्यात येणार आहे. त्याचा पायाभरणी कार्यक्रम पार पडला.

लिंडे एक अग्रगण्य जागतिक औद्योगिक वायू आणि अभियांत्रिकी कंपनी आहे. जी उच्च गुणवत्तेचे उपाय, तंत्रज्ञान आणि सेवा प्रदान करते. या कंपनीतर्फे सामाजिक बांधिलकी म्हणून नियमित विविध उपक्रम हाती घेण्यात येते. महेश फौंडेशनला विविध स्वरुपाची मदत केली असून, त्यामध्ये आता स्कूलबसची भर घालण्यात आली आहे. लिंडे इंडिया लिमिटेडची उपकंपनी असलेल्या लिंडेपीएलसीने सीएसआर उपक्रमाचा भाग म्हणून, महेश फौंडेशनच्या उत्कर्ष लर्निंग सेंटर शाळेतील १००हुन अधिक गरीब व वंचित मुलांना शाळेला ये-जा करण्यासाठी स्कूलबस प्रदान केली.
यावेळी लिंडे कंपनीच्या साऊथ आशिया विपणन व दळणवळणचे संचालक बिभा बासू सेनगुप्ता यांनी महेश फौंडेशनच्या सहकार्यामुळे उ. कर्नाटकातील वैद्यकीयदृष्ट्या कमकुवत, वंचित मुलांना मदत देणे शक्य झाले. लिंडे व महेश फाउंडेशन यांनी एकत्रितपणे अनेक वैद्यकीयदृष्ट्या कमकुवत आणि वंचित मुलांना निवारा, पोषण, आरोग्यसेवा आणि शिक्षण प्रदान करण्यात यश मिळविल्याचे सांगितले.

महेश फौंडेशन कणबर्गीत महत्वकांक्षी नवीन कौशल्य विकास केंद्राची स्थापना करत आहे. त्याची पायाभरणी पाहुण्यांच्या हस्ते झाली. वंचित मुली, महिलांना मूलभूत संगणक प्रशिक्षण, शिलाई, कला, हस्तकला, सॉफ्टस्किल्सचे प्रशिक्षण या केंद्रातून मिळेल. त्याद्वारे त्यांचे जीवमान उंचविण्यासाठी मदत मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी लिंडे कंपनीचे अधिकारी सदानंद हल्लूर यांनी महेश फौंडेशनच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

महेश फौंडेशनचे संस्थापक महेश जाधव म्हणाले, ‘महेश फौंडेशनला लिंडे कंपनीतर्फे मोलाची साथ मिळते. स्कूलबस त्याचा भाग आहे. येथील विद्यार्थ्यांचा विचार करून बस दिल्यामुळे उत्कर्षा लर्निंग केंद्रातील शंभरहून अधिक वंचित मुलांना सुरक्षित प्रवास दररोज मिळणार आहे, ही मदत खूप मोठी आहे.’  यावेळी महेश फौंडेशनचे पदाधिकारी व मुले उपस्थित होती.

Tags: