बेळगावात पहिल्या अंडर ग्राउंड डस्टबिनचे आ. अभय पाटील यांच्याहस्ते आज उदघाटन करण्यात आले.
बेळगाव शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विकास केंद्रीभूत मानून चालणाऱ्या बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन योजना राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज बसवेश्वर सर्कल, गोवावेस येथे शहरातील पहिल्या अंडर ग्राउंड डस्टबिनचे आ. अभय पाटील यांच्याहस्ते आज उदघाटन करण्यात आले.
या ठिकाणी फुटपाथलगत चौकोनी आकारात झाकण असलेले कचराकुंड बसवण्यात आले आहे. कचऱ्याने भरलेले कुंड क्रेनच्या सहाय्याने वर ओढून कचरागाडीत ओतण्याची सोय यात आहे. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखवण्यात आले. महापालिका अधिकाऱ्यांनी आ. अभय पाटील यांना या प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना आ. अभय पाटील म्हणाले, संपूर्ण भारतातीलच हा पहिला अनोखा अंडरग्राउंड डस्टबिन विथ सेन्सर हैड्रॉलिक ऑपरेटेड वेहीकल प्रकल्प आहे. यात ७०% कचरा भरल्यावर संबंधित कचरा संकलन वाहनाचे चालक व कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना मेसेज जातो. त्यानंतर ९०% कचरा भरल्यावर त्या सर्वाना पुन्हा एकदा मेसेज जातो. १००% कचरा भरल्यावर मेसेज जाऊन कचरा उचल न केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांना दंड आकारण्याची तरतूद आहे. बेळगाव शहरात कचऱ्याचे १२० ब्लॅक स्पॉट आहेत.

लवकरच त्या सगळ्या ठिकाणी असे अंडरग्राउंड डस्टबिन बसवण्यात येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्वावर शहरातील १८ ठिकाणी ते बसविण्यात येणार आहेत. यातील हैड्रॉलिक वाहनाची किंमत ८० लाख रुपये असून डस्टबीनची किंमत ६.५ लाख रुपये आहे. ३ टन कचरा संकलनाची डस्टबीनची क्षमता आहे. बेळगाव शहर स्वच्छ, सुंदर,कचरामुक्त करण्यासाठी मनपातर्फे आम्ही हा प्रकल्प राबवत आहोत. जनतेनेही आता खुल्या जागांवर कचरा न टाकता या डस्टबीनमध्ये येऊन कचरा टाकावा आणि शहर सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आ. अभय पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी मनपा आयुक्त रुद्रेश घाळी, मनपा पर्यावरण अधिकारी कलादगी, नगरसेवक गिरीश धोंगडी, नितीन जाधव, वाणी जोशी, सारिका पाटील व अन्य नगरसेवक, पालिका अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments