बेळगावात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी आज टिळकवाडी परिसरात तंबाखू आणि व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती रॅली काढली. इंटरॅक्ट क्लब आणि टिळकवाडी पोलीस स्थानकाच्या अपराध नियंत्रण मासानिमित्त या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
टिळकवाडीतील जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम शाळा, ठळकवाडी हायस्कूल आणि बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज टिळकवाडी परिसरात तंबाखू व्यसनमुक्तीसाठी जनजागृती फेरी काढली. इंटरॅक्ट क्लब आणि टिळकवाडी पोलिसांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली. यावेळी विध्यार्थ्यानी ढोल-ताशासह विविध मार्गावर लक्षवेधी संचलन करून व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत लोकांमध्ये जागृती केली.
पोलीस स्थानकाचे पीएसआय मणिकंठ पुजारी म्हणाले, कसल्याही प्रकारच्या व्यसनांचे शरीरावर आणि पर्यायाने कुटुंबावर नक्कीच दुष्परिणाम होतात. त्यामुळे तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. विध्यार्थी वयात चांगल्या सवयी लावून घ्या, अभ्यासावरच लक्ष केंद्रित करा, लायसन्स नसताना वाहने चालवू नका, वाईट संगत, सवयींपासून दूर रहा, शाळेबाहेरचे कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर शिक्षकांशी किंवा पोलिसांशी सम्पर्क साधून न घाबरता तक्रार द्या, असे आवाहन त्यांनी विध्यार्थ्यांना केले.
जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम शाळेच्या प्राचार्या नवीना शेट्टीगार यांनी, रॅलीबाबत माहिती देताना सांगितले की, विध्यार्थ्यांना लहान वयातच व्यसनांचे दुष्परिणाम सांगून जागृती करण्याच्या उद्देशाने ही रॅली काढली आहे. टिळकवाडीतील जी. जी. चिटणीस इंग्लिश माध्यम शाळा, ठळकवाडी हायस्कूल आणि बालिका आदर्श विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंटरॅक्ट क्लब आणि टिळकवाडी पोलिसांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढली आहे. विद्यार्थ्यांनी रॅलीत उत्साहाने भाग घेऊन नागरिकांत व्यसनांविषयी जागृती केली असून रॅलीचा उद्देश सफल झाला आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, विध्यार्थ्यांच्या या रॅलीमुळे टिळकवाडी परिसरात नागरिकांमध्ये व्यसनमुक्तीचा संदेश देण्यात आला.


Recent Comments