Crime

बापाकडून मुलाची सुपारी देऊन हत्या : बाप, सुपारी किलर्सना अटक

Share

जगात शांतता नांदावी अशी प्रार्थना करणाऱ्या, मुंगीही मरू न देणाऱ्या जैन समाजाला आणि एकूणच नागरी समाजाला लाजेने मान खाली घालायला लावणाऱ्या, बापाने आपल्याच मुलाची सुपारी देऊन हत्या केल्याचे प्रकरण अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. चिखलाने माखलेल्या मृतदेह शोधून काढत पोलीस अंतिम टप्प्यातील तपास करत आहेत. पण आपला मुलगा गमावलेली अभागी आई आपल्या पतीने सांगितलेले सत्य खोटे मानते आणि अद्याप न आलेल्या आपल्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. याबाबत सादर आहे हा वृत्तांत.

होय..अखिलच्या वडिल भरत जैन यांनीच त्याच्या हत्येचा मास्टर प्लॅन बनवला होता आणि आपल्या मुलाला कारमधून घरातून नेऊन मारेकऱ्यांच्या हवाली केल्याची माहिती समोर आली आहे. रेहमान विजापुरे, महादेव नालवाड, सलीम सलाहुद्दीन यांना मुलाच्या हत्येसाठी दहा लाख देण्याची तयारी दर्शवली होती. हत्येचा गुन्हा कबूल केलेल्या नराधमांनी धारवाड जिल्ह्यातील कलघटगी बाहेरील आरोपी रेहमान विजापूरे याच्या नातेवाईकाच्या उसाच्या शेतात अखिलला ठार मारण्याचा कट रचला होता. पण अखिलला कलघटगीपर्यंत आणण्याची जबाबदारी फक्त त्याच्या वडिलांची होती.

योजनेनुसार, भरत जैन 1 डिसेंबर रोजी आरोपी रेहमानसोबत दुपारच्या जेवणासाठी घरी गेला. जेवणानंतर त्याने अखिलला फोन केला आणि त्याला सांगितले की कलघटगी येथे धाबा बांधण्यासाठी काही साहित्य पुरवण्याची ऑर्डर आली आहे. तेथे जाऊन बघूया म्हणून बोलावले. वडिलांचे म्हणणे मान्य करून अखिल तयार झाला. त्याने वडिलांना व मारेकऱ्याला स्वत:च्या गाडीतून घेऊन कलघटगीजवळील उसाच्या शेतात आला. भातशेतीत बांधकाम सुरू असलेले पत्र्याचे शेड दाखवून तेथे पीओपी करा, असे नाटक करून शेतात नेले. योजनेनुसार भरतने मुलाला आत पाठवले, तो बाहेर आला आणि गाडी घेऊन परत हुबळीला गेला.

इकडे भरत हुबळीला जात असताना मारेकर्यांनी अखिलवर मागून हल्ला केला, हात-पाय दोरीने बांधले, तोंड कापडाने कोंबून त्याचा श्वास कोंडला. मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच भरत यांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पण तपासात सत्य बाहेर आले आणि आपणच विणलेल्या दुष्कृत्याच्या जाळयात स्वतःच अडकला आणि गजाआड झालाय.

Tags:

FATHER GIVES SUPARI TO KILL HIS SON