कर्नाटकात निवडणुकीचा ज्वर आला आहे. आता प्रत्येकजण एक ना एक स्वतंत्र पक्ष काढणारच असे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी सांगितले.
विजापुरात आज प्रसारमाध्यमांशी बोलताना, जनार्दन रेड्डी यांच्या नव्या पक्षामुळे भाजपला फटका बसेल का या प्रश्नावर, भाजपचे आमदार यत्नाळ म्हणाले की, काही लोक इथून लढणार, तिथून लढणार असे सांगतात, केवळ पैसे मिळवण्यासाठी विधाने करतात. हा माझा पूर्वीचा मतदारसंघ होता म्हणतात, विजापूर जिल्ह्यातही असे काही लोक आहेत. त्यांचा व्यवसाय काय, निवडणूक आली की इकडे-तिकडे निवडणूक लढवणार असल्याचे सांगत पैसे मिळवणे. एम.बी.पाटील यांनि सगळ्यांना वाईट सवय लावली आहे. पैसा जमवण्याचे काम करताहेत. डोके बाद करून घेऊ नका असे सांगत, अप्रत्यक्षपणे यत्नाळ यांनी काँग्रेसचे आमदार शिवानंद पाटील यांच्यावर निशाणा साधला.

आ. यत्नाळ पुढे म्हणाले, गुजरात मॉडेल कर्नाटकात राबवले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे मी सहा महिन्यांपूर्वीच म्हटले होते. पंतप्रधानांकडे कर्नाटकातील प्रत्येक मतदारसंघातील प्रत्येक आमदाराची माहिती आहे. गुजरात मॉडेलवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट वाटपाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीच्या निकालानंतर निवडणुकीसाठी कोणते बदल आवश्यक आहेत हे हायकमांड ठरवेल. आमच्या हायकमांडने बरेच सर्वेक्षण केले आहे. मंत्री आणि आमदारांची माहिती गोळा केली आहे. हायकमांड जो निर्णय घेईल त्याचे आम्ही पालन करू, असे ते म्हणाले.

आ. यत्नाळ यांनी, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादासंदर्भात महाराष्ट्राविरोधात आगपाखड केली. महाराष्ट्राने सीमाप्रश्नावर अशीच भूमिका घेतली आहे. महाजन आयोग महाराष्ट्र सरकारच्या मागणीवरून स्थापन करण्यात आला होता. नंतर महाजन अहवालावर वाद घातला. कर्नाटक-महाराष्ट्र, कन्नड-मराठी असा वाद निर्माण केला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्होट बँकेसाठी ही चाल खेळत आहेत. महाराष्ट्र भाजप असो, शिवसेना असो की एमईएस असो, हे सगळे मतांचे राजकारण करत आहेत. महाजन आयोगाचा अहवाल स्वीकारणे हाच उपाय असल्याचे यत्नाळ म्हणाले. एकंदर विविध मुद्द्यांवर यत्नाळ यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.


Recent Comments