Belagavi

‘आरएलएस’च्या प्रदर्शनात विध्यार्थ्यांचे क्रांतिकारी आविष्कार !

Share

टाळी आणि टिचकीवर सुरु होणारे इलेक्ट्रिक सर्किट, मेडिसिनल प्रोजेक्ट अशा विध्यार्थ्यांच्या सुपीक डोक्यातून निघालेले विविध क्रांतिकारी आविष्कार बेळगावात आज पहायला मिळाले. निमित्त होते, आरएलएस पदवीपूर्व महाविद्यालयातील विज्ञान प्रदर्शनाचे !

केएलई संस्थेचे राजा लखमगौडा पदवीपूर्व विज्ञान महाविद्यालय (आरएलएस) आणि कर्नाटक राज्य विज्ञान परिषदेच्या डॉ. एस. जे. नागलोतीमठ जिल्हा विज्ञान केंद्राच्या वतीने बेळगावातील आरएलएस महाविद्यालयात आज आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात विविध शाळा-महाविद्यालयांच्या विध्यार्थ्यानी आपल्या कल्पनाशक्तीवर आधारित विविध विज्ञान प्रकल्प सादर केले. अनेक विस्मयकारक प्रकल्प पाहून प्रदर्शनाला भेट देणारे अचंबित झाले.

या संदर्भात माहिती देताना आरएलएस महाविद्यालयाचे प्राचार्य विश्वनाथ कामगौडा यांनी सांगितले की, विध्यार्थ्यांच्या प्रतिभाशक्तीला वाव देण्यासाठी या विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यासाठी केएलई संस्थेने खूप सहकार्य केले आहे. प्रदर्शनात विध्यार्थ्यानी अनेक आविष्कार प्रकल्प सादर केले आहेत. ते पाहून आम्ही शिक्षकवर्गही स्तिमित झालो आहोत. विध्यार्थ्यानी अतिशय संशोधन वृत्तीने माहिती संकलित करून प्रयोगाधारित वैविध्यपूर्ण प्रकल्प मांडले आहेत. यातून भविष्यात चांगले प्रतिभावंत, जिज्ञासू वैज्ञानिक निर्माण होतील. अशी प्रदर्शने पाहण्यास पालक आणि शिक्षकांनी विध्यार्थ्यांना प्रोत्साहित केले पाहिजे. आतापर्यंत विविध शाळा-महाविद्यालयांच्या पाचशेहून अधिक विध्यार्थ्यानी प्रदर्शनाला भेट देऊन पाहणी केली आहे. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागातील सुमारे तीस शाळा-महाविद्यालयांच्या विध्यार्थ्यानी या प्रदर्शनात सहभागी होऊन प्रकल्प सादर केले आहेत असे त्यांनी सांगितले.

प्रदर्शनात टाळी आणि टिचकीवर सुरु होणाऱ्या इलेक्ट्रिक सर्किटचा प्रकल्प सादर केलेल्या आकाश कंग्राळकर या विद्यार्थ्याने सांगितले की, रजिस्टर्स, सेमी कंडक्टर, कॅपॅसिटर्स, ट्रान्सफॉर्मर आदी साहित्य वापरून मी इलेक्ट्रिक हॉबीसीस सर्किट प्रोजेक्ट केला आहे. टाळी किंवा टिचकी यावर बल्ब पेटतो अशी याची रचना आहे.

एकंदर, एका अनोख्या विज्ञान प्रदर्शन पाहण्याचा आनंद बेळगावातील विध्यार्थ्यांना आज या निमित्ताने मिळाला. शिवाय भविष्यातल्या वैज्ञानिकांच्या प्रतिभेची चुणूकही पहायला मिळाली.

Tags: