सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांकडून काही आगळीक होऊ नये, यासाठी कागवाड तालुक्याच्या सीमेवर अथणीचे डीवायएसपी श्रीपाद जल्दे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा पेटल्याच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे ४ वाजल्यापासून कागवाड तालुक्याच्या सीमेवर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांची कसून तपासणी करून त्यांना सोडण्यात येत आहे.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री बेळगावात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यातील सीमावर्ती भागात बंदोबस्त तैनात केला आहे. कागवाडमध्ये डीवायएसपी श्रीपाद जल्दे, सीपीआय रवींद्र नायकवडी, पीएसआय हनुमंत नरळे व त्यांचे कर्मचारी सुरक्षेत सहभागी झाले आहेत. डीवायएसपी श्रीपाद जल्दे आणि सीपीआय रवींद्र नायकवडी आणि महाराष्ट्रातील मिरज पोलिस उपविभागाचे डीवायएसपी नारायण देशमुख आणि त्यांचे कर्मचारी यांच्यात सीमेवर बंदोबस्त आणि इतर विविध मुद्द्यांवर चाय-पे चर्चा झाली. कोणतीही कटु घटना घडू नये या पार्श्वभूमीवर सलोखापूर्ण चर्चा झाली. दोन्ही राज्यांतील प्रवाशांची सुरळीत वाहतूक सुरु होती. सायंकाळी उशिरापर्यंत कोणतीही अनुचित घटना घडली नसल्याने सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला.


Recent Comments