Banglore

आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संविधानात उपाय : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सरकार संविधानाच्या मदतीने उपाय शोधू शकते. आमचे सरकार या अनुषंगाने राज्यात काम करत आहे असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकर यांच्या आज ६६ व्या महापरिनिर्वाण व पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
बोम्मई पुढे म्हणाले, बदललेल्या काळातील समस्या आणि आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आंबेडकरांनी घटनादुरुस्तीची केलेली तरतूद बदलत्या काळाला प्रतिसाद देणारी आहे. लोकशाही कशी यशस्वी होऊ शकते हे बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिले. अनेक भाषा, जाती आणि प्रदेश मिळून बनलेल्या भारतात त्यांनी सर्वांच्या भावना एकत्र करून एक संविधान बनवले आणि अखंड भारताची निर्मिती केली आणि लोकशाहीचे चैतन्य प्रदीर्घ काळ टिकवले, असे ते म्हणाले.

राज्यघटना नसती तर काय झाले असते याची कल्पनाही करणे अशक्य आहे. लोकशाहीचा प्रयोग करण्यात अनेक देशांना यश आलेले नाही, तिथे भारत यशस्वी होण्याचे कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी केलेले काम वेळोवेळी प्रासंगिक आणि कायमस्वरूपी होत आहे. भारताचे खरे रत्न म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. संविधानातील समता, एकता, संघव्यवस्था आणि बंधुता यांसारख्या अत्यंत मानवतावादी विचारांचा अवलंब करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनी उपेक्षित आणि शोषित वर्गाला संविधानाचे संरक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणले. जेणेकरुन इतरांना त्यांच्या जीवनातील वेदना व अपमानाचा अनुभव घ्यावा लागू नये. त्यांनी भारताच्या आर्थिक विकासाला आणि अर्थव्यवस्थेतील समानतेच्या वाढीला महत्त्व दिल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षण, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीचा नारा देत त्यांनी लोकांना जागृत, हुशार आणि संघर्षशील बनवण्याची प्रेरणा दिली. आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या अंतर्गत काम करण्याची संधी मिळाल्याने आपण सर्वजण खरोखरच धन्य आहोत, असे ते म्हणाले. राज्यघटनेतील अपेक्षा संपूर्णत: पूर्ण करण्यासाठी प्रशासन, सत्ताधारी वर्ग आणि समाज या सर्वांनी निर्धार आणि तयारीने काम केले पाहिजे असे बोम्मई म्हणाले.

अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणात वाढ करून सरकारने क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे सांगून मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, या निर्णयाने भविष्यात त्यांची मुले शिक्षण आणि नोकरीत सक्षम होतील. एससीएस, पीटीएसपी अनुदानासाठी 29 हजार कोटी राखून ठेवले आहेत. दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने एकूण 100 आंबेडकर वसतिगृहे, 55 कनकदास वसतिगृहे आणि 5 मेगा वसतिगृहे म्हैसूर, धारवाड, मंगळुर, बंगळुर, कलबुर्गी येथे बांधण्यात येत आहेत. नोकरदार मुलींसाठी वसतिगृह, 75 युनिटपर्यंत मोफत वीजपुरवठा, घरबांधणीसाठी 2 लाख रुपये अनुदान, जमीन मालकी योजनेसाठी अनुदान 15 लाखांवरून 20 लाख रुपये, वसतिगृहांचे शुल्क, रोजगारासाठी विशेष कार्यक्रम, आंबेडकरांनी कर्नाटकात भेट दिलेल्या 10 ठिकाणांचा विकास करण्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विकास सौधसमोर डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या नावे स्फूर्ती भवन उभारणीसाठी पायाभरणी केली असून त्यासाठी 50 कोटी निधी जाहीर केला आहे. एकात्मिक विकासाच्या संकल्पनेवर सरकार काम करत आहे. येणाऱ्या काळात अनुसूचित जाती-जमाती आर्थिक, शैक्षणिकदृष्ट्या मजबूत, सक्षम, स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगतील अशी आमची आशा आहे, असे बोम्मई म्हणाले.

यावेळी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ तसेच वरिष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Tags: