भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बेळगावातही आज प्रशासन आणि विविध संघ-संस्थांकडून या महामानवाला अभिवादन करण्यात आले.
होय, 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. यामुळे संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना “महामानव” अशी ही पदवी देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब एक लेखक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, समाजसुधारक आणि पत्रकारही होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ‘भारतीय राज्यघटनेचे जनक’ म्हणूनही ओळखलं जातं. बाबासाहेब आंबेडकर हे पहिले भारतीय होते ज्यांनी अर्थशास्त्रात डॉक्टरेट पदवी मिळवली. अशा या महामानवाला अभिवादन करण्यासाठी बेळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात हजारो अनुयायांनी सकाळपासूनच गर्दी केली.

बेळगाव जिल्हा प्रशासन, समाजकल्याण खाते आणि बेळगाव महानगर पालिकेतर्फे आंबडेकर उद्यानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन गांभीर्याने पाळण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. नितीश पाटील, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, समाजकल्याण खात्याच्या सहसंचालिका उमा सालीगौडर यांनी उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नमन केले. त्याशिवाय जिल्ह्यातील विविध दलित संघटना, संस्था आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नमन केले.
यावेळी दलित नेते मल्लेश कुरंगी, बाबू पुजारी, शिवपुत्रप्पा मेत्री, सुधीर चौगुले, चलवादी महासभेचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश मेत्री, एम. आर. कलपत्री, कोलकार यांच्यासह विविध दलित संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments