Belagavi

बेळगाव, चिक्कोडी, निपाणीत लवकरच आंबेडकर स्मारक उभारणार : जिल्हाधिकारी

Share

बेळगाव, चिक्कोडी, निपाणी येथे लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकांची उभारणी करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी दिली.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 66वा महापरिनिर्वाण दिन. त्यानिमित्त आज बेळगावातील आंबेडकर उद्यानात आज मंगळवारी जिल्हा प्रशासनातर्फे या महामानवाला अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ. नितीश पाटील, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, समाजकल्याण खात्याच्या सहसंचालिका उमा सालीगौडर यांनी उद्यानातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. नितीश पाटील म्हणाले, बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण जगातच आदर्श ठरेल अशी घटना लिहिली. त्यामुळे दीनदलित, वंचितांना समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळाली. त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून जात आपण एक उत्तम समाज, उत्तम देश निर्माण करण्याचा संकल्प केला पाहिजे.

जिल्हाधिकारी पाटील पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव शहर, निपाणी आणि चिक्कोडी या तीन ठिकाणी भेट दिली होती. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकी दहा गुंठे जागा मंजूर करण्यात आली असून, राज्य शासनाने अर्थसंकल्पात तरतूद केलेला सहा कोटी रुपये निधी जिल्हा प्रशासनाला हस्तांतरित केला आहे. लवकरच या तिन्ही ठिकाणी भूमिपूजन करून आंबेडकर स्मारकाचे काम सुरु करण्यात येईल. निर्दिष्ट वेळेत काम पूर्ण करून तेथे सुसज्ज ग्रंथालय, अध्ययन केंद्र सुरु करण्यात येतील असे जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी सांगितले.

यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, समाजकल्याण खात्याच्या सहसंचालिका उमा सालीगौडर आदी उपस्थित होते.

Tags: