Belagavi

न्यू वीरभद्रनगरात कचरा व्यवस्थापन प्रकल्प नकोच !

Share

बेळगाव महानगर पालिकेच्या प्रभाग क्र. 12 मध्ये येणाऱ्या वीरभद्रनगरात कचरा व्यवस्थापन प्रकल्प नकोच अशी भूमिका स्थानिक रहिवाशांनी घेतली आहे. रहिवाशांनी आज शुक्रवारी नियोजित प्रकल्पस्थळी जाऊन प्रकल्पाला सामूहिक विरोध केला.

होय, बेळगाव महानगरपालिकेच्या प्रभाग प्रभाग क्र. 12 मध्ये येणाऱ्या वीरभद्रनगरातील पालिकेच्या खुल्या जागेवर कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्याचा निर्णय बेळगाव महानगरपालिकेने घेतला आहे. मात्र या प्रकल्पामुळे या परिसरात वाहतुकीची, प्रदूषण आणि दुर्गंधीची समस्या निर्माण होणार असल्याच्या मुद्द्यावरून स्थानिक रहिवाशांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. पालिकेने सध्या या प्रकल्पासाठी आराखडा तयार करून कॉलम उभारणी सुरु केली आहे. कोणालाही कल्पना न देता अचानक याठिकाणी कचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा बोर्ड लावून कामाला प्रारंभ केल्याने रहिवाशांनी विरोध केला आहे.

यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभाग क्र. 12चे नगरसेवक बाबाजान मतवाले यांनी सांगितले की, या प्रभागात न्यू वीरभद्रनगर डबल रोड परिसरात महापालिकेच्या मालकीची खुली जागा आहे. पण त्या जागेवरून कोर्टात केस सुरु आहे. त्यातच आता पालिकेने या जागेवर कचरा व्यस्थापन प्रकल्प सुरु करण्याचा घाट घातला आहे. सुमारे महिन्यापूर्वी उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी या ठिकाणी कामाला चालना दिली. त्यानंतर बोर्ड लावून काम सुरु करण्यात येईल आहे. या प्रकल्पाच्या परिसरात एक मोठी शाळा, स्पोर्ट्स कॉप्म्लेक्स, जैन मंदिर, प्रार्थनास्थळ आहेत. येथे प्रकल्प सुरु केल्यास वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल, लहान मुले आणि ज्येष्ठांना येण्याजाण्यास त्रास होईल म्हणू स्थानिक रहिवासी याला विरोध करत आहेत. आज वीरभद्रनगर,शिवबसव नगर, रामनगर, आझमनगर, आसदखान कॉलनी, सुभाषनगर आदी परिसरातील नागरिकांनी येथे येऊन प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. काहीही झाले तरी आम्ही हा प्रकल्प सुरु होऊ देणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावेळी युनूस मोमीन, दावची, इस्माईल आदींसह स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकंदर, न्यू वीरभद्रनगर येथील नियोजित कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थानिक रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे. आता बेळगाव महानगरपालिका यावर कोणती भूमिका घेते हे पहावे लागेल.

Tags:

IRBHADRNGR RESIDENTS OPPOSE GARBAGE PLANT