कर्नाटकाच्या भूमीचे आणि जगभरातील कन्नडिगांचे रक्षण करण्यास आणि विकास करण्यास सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

रामदुर्ग तालुक्यातील सालहळ्ळी येथे आज 671.28 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उदघाटन केल्यावर ते बोलत होते. बोम्मई पुढे म्हणाले, आमचे सरकार एकात्मिक कर्नाटकच्या विकासासाठी काम करत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, गोवा आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये 1800 ग्रामपंचायतींच्या विकासाची योजना राबविण्यात येत आहे. तसेच रस्त्यांच्या सुधारणेसाठी विशेष कार्यक्रम आखण्यात आला आहे. सीमावर्ती शाळांच्या विकासासाठी कन्नड विकास प्राधिकरणामार्फत यावर्षी १०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. गोव्यात दहा कोटी रुपये खर्चून कन्नड भवन बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोलापूर आणि कासारगोड येथे कन्नड भवन बांधण्यासाठी सरकार प्रत्येकी दहा कोटी रुपये देणार आहे.

सर्वात मोठा जिल्हा असल्याने बेळगाव हा राज्याचा मुकुटमणी आहे. या जिल्ह्यातील सिंचन, उद्योग आणि शेतीच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. उत्तर कर्नाटकच्या सर्वसमावेशक प्रगतीसाठी सरकार येत्या काही दिवसांत विशेष योजना जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महादेवप्पा यादवाड लोकप्रियच नव्हे तर लोकोपयोगी आमदार आहेत. खरे आमदार तेच असतात जे लोकांचे जीवनमान उंचावतात आणि स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन निर्माण करतात. आ. यादवाड 2900 कोटी रुपयांचे अनुदान आणून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी गंगा घरोघरी नेण्याचे काम केल्याचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
यावेळी बोलतांना जिल्हा पालक मंत्री गोविंद कारजोळ म्हणाले की, स्थानिक आमदार महादेवप्पा यादवाड यांच्या प्रयत्नांमुळे रामदुर्ग मतदार संघात विकासकामांसाठी मोठा निधी आला आहे. मलप्रभा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या गावांच्या संरक्षणासाठी 126 कोटी रुपये खर्चून कंपाऊंड बांधण्यासह विविध कामे करण्यात येत आहेत. रामदुर्ग तालुक्यातील 19 तलाव भरण्याच्या प्रकल्पाबाबत अधिकाऱ्यांना या महिन्यात डीपीआर तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत, येत्या अर्थसंकल्पात तलाव भरण्याच्या प्रकल्पासाठी अधिक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन मंत्री कारजोळ यांनी दिले.
धर्मादाय, हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले, बांधकाम मंत्री सी. सी. पाटील, उद्योग मंत्री मुरुगेश निराणी, नगरविकास मंत्री बैरती बसवराज, केएमएफचे अध्यक्ष आमदार भालचंद्र जारकीहोळी, खासदार अण्णासाहेब जोल्ले, मंगल अंगडी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, तांडा विकास महामंडळाचे अध्यक्ष पी. राजीव, हस्तकला विकास महामंडळाचे अध्यक्ष मारुती अष्टगी, विधान परिषद सदस्य लक्ष्मण सवदी, हनुमंत निरानी, आमदार अनिल बेनके, डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.


Recent Comments