बेळगावातील लव्ह डेल सेंट्रल स्कूलमध्ये शनिवारपासून सीबीएसई शाळांच्या क्लस्टरस्तरीय फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत. 19 वर्षाखालील गटातील या स्पर्धा दि. 3, 4, 5 डिसेंबरला लव्ह डेल सेंट्रल स्कूल शाळेच्या फूटबॉल मैदानावर होणार आहे, अशी माहिती शाळेच्या संचालिका प्रेरणा घाटगे यांनी दिली.
या संदर्भात आज गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संचालिका प्रेरणा घाटगे पुढे म्हणाल्या की, या स्पर्धेत राज्यभरातून 56 सीबीएसई शालेय संघ सहभागी होणार आहेत. शुक्रवार दि. 2 रोजी सायंकाळी 6 वा. मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. दि. 3, 4 व 5 रोजी दिवस-रात्र, प्रकाशझोतात या स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत बेंगळूर, म्हैसूर, गुलबर्गा, मंगळूर, उडुपी, दावणगेरे, विजापूर, मंड्या, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, चित्रदूर्ग, गदग, रायचूर, शिमोगा, रामनगर, तुमकूर, हुबळी, धारवाड आदि ठिकाणचे 800 हून अधिक फूटबॉलपटू सहभागी होणार आहेत. सोमवार दि. 5 रोजी सायंकाळी स्पर्धेचा समारोप समारंभ होणार असून, त्यावेळी विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
यावेळी प्राचार्या लक्ष्मी इंचल यांनी स्पर्धेच्या संयोजनाची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला प्राचार्या लक्ष्मी इंचल, क्रीडा शिक्षक बसू अगसगी, विनायक मोरे, कलमेश एच्. उपस्थित होते.
Recent Comments