मतदार यादी पुनरीक्षणासाठी आलेल्या एका खासगी व्यक्तीला पकडल्याची घटना घडली आहे. विजापूरचे आमदार यत्नाळ यांचा हात यामागे आहे. काही लोकांची नावे ते हवी तशी हटवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते करत आहेत. याबाबतचा संपूर्ण वृत्तांत पहा…
होय, बेंगळुरमधील चिलुमे नावाच्या एनजीओने व्होटर आयडी रिव्हिजनच्या नावाखाली मतदार यादीतून नावे डिलीट केल्याचे कथित प्रकरण सध्या गाजत आहे. याचे धागेदोरे घुमटनगरी विजापूर येथेही पसरले आहेत, विजापूर शहराचे आमदार त्यांच्या खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांकरवी काहींची नावे हटवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते हमीद मुश्रीफ यांनी केला आहे.
विजापूर काँग्रेस कार्यालयाजवळ आज तीन जणांनी घरोघरी जाऊन तुम्ही कोणाला मतदान करता अशी विचारणा केली. त्यांनी काँग्रेसला मतदान करणार असल्याचे सांगितल्यावर त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना पकडण्यासाठी गेले असता दोघे पळून गेले तर एक पकडला गेला. नंतर शहराच्या आमदारांच्या पीएने फोन करून त्यांना सोडण्याची विनंती केली. त्यांच्याकडे असलेली मतदान ओळखपत्रे तहसीलदारांना देऊ असे त्यांनी सांगितले असे मुश्रीफ यांनी सांगितले.

गेल्या महापालिका निवडणुकीतही त्यांनी असाच प्रकार केला आणि काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव केला. या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्यात यावी, आम्ही जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार आहोत, असे ते म्हणाले. विजापूर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री प्रियांक खर्गे यांनी, मला वाटते की सरकारने हे बेंगळूरपुरते मर्यादित ठेवले नाही. माझ्या माहितीनुसार, रामनगर, मंड्या, गुलबर्गा येथेही असा प्रकार झाला आहे. माझ्या मतदारसंघात 16 हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विशेष म्हणजे, ब्लॉक काँग्रेस अध्यक्षांचे नावही वगळले आहे. ते व्यवस्थित यंत्रणा राबवून हा गैरप्रकार करत आहेत. मॅपिंगमध्ये अंतर आहे, खासगी संस्थेला मतदारांची माहिती कशी मिळू शकते, असा सवाल करून प्रियांक खर्गे यांनी सरकारवर सडकून टीका केली.
विजापूर पालिका निवडणुकीवेळी 20 हजार मतदारांची ओळखपत्रे रद्द झाल्याने मोठा गोंधळ उडाला आहे. तशातच आता काँग्रेसच्या मतदारांची मतदार ओळखपत्रे खासगी व्यक्तींद्वारे हटवण्यात येत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. आगामी काळात निवडणूक आयोगाचे अधिकारी याची चौकशी करतील का, याची प्रतीक्षा करूया…
विजयकुमार सारवाड, आपली मराठी, विजापूर


Recent Comments