Belagavi

दंगा करणारे कोणीही असोत, कठोर कारवाई होणार ! : एडीजीपी अलोककुमार

Share

एमईएस असो किंवा अन्य कोणी, प्रत्येकजण पुंड आहे. दंगा करणारे कोणीही असोत, कठोर कारवाई होणार असा कडक इशारा एडीजीपी अलोककुमार यांनी दिला.

एडीजीपी आलोककुमार यांनी मंगळवारी बेळगावमध्ये पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीपूर्वी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, बेळगावातील सुवर्णसौध येथे 19 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे त्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आज बेळगावात आलो आहे. आमच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच बैठक घेतली आहे. अधिवेशन काळात पंचमसाली आरक्षण, शेतकरी, मादिग आरक्षणासाठी आणि शेतकऱ्यांचे आंदोलन अशी अनेक आंदोलने आणि जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कोणतीही आपत्ती घडू नये, मागील वर्षी झालेल्या दगडफेकीच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही सर्व व्यवस्था केली आहे. आम्ही बाहेरील पोलिसांसह 4 हजार पोलिस तैनात करत आहोत. एकूण 35 प्लॅटून्स तैनात करत आहोत. किमान सात-आठ एसपी, 38 डीएसपी, 80 इन्स्पेक्टर नेमण्यात येतील. आम्ही पुरेसे कर्मचारी आणि वाहनांची व्यवस्था करू. थंडीमुळे पोलिसांची राहण्याची उत्तम व्यवस्था करू. असेंब्ली, कौन्सिल हॉल, सीएम चेंबरची पाहणी केली आहे. आयजीपी सतीशकुमार, एसपी डॉ. संजीव पाटील, शहर पोलिस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, डीसीपी रवींद्र गडाडी, पी. व्ही. स्नेहा आणि इतर केएसआरपी अधिकारी आहेत. सर्वांशी चर्चा करू. अधिवेशन यशस्वीतेसाठी सर्व उपाययोजना करू, असे त्यांनी सांगितले.

अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा आयोजित करणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना अलोककुमार म्हणाले, शांततापूर्ण निषेध करण्यास कोणताही अडथळा नाही. मात्र त्याचा कोणाला त्रास होणार असेल तर आम्ही कडक कारवाई करू. जर तुम्ही गडबड केलीत तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू. गेल्या पाच महिन्यात बेळगावात काही गोंधळ झाला आहे का? कोणी काही केल्यास आम्ही कठोर कारवाई करू, असे ते म्हणाले.

येत्या 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्राचे मंत्री बेळगाव दौऱ्यावर येत असल्याबाबत बोलताना अलोककुमार म्हणाले, वेगवेगळ्या वैयक्तिक कारणाने स्वतंत्रपणे येत असतील. काही गडबड-गोंधळ माजवायला आल्यास आम्ही नक्कीच कारवाई करू. पण कोणाशी सल्लामसलत करायला, कोणाच्या घरी जेवायला, लग्न समारंभासाठी कोणी आले तर आम्हाला काहीच करता येत नाही. कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाल्यास निश्चितच कारवाई करू. कुठल्याही पुंडांनी धुमाकूळ घातला तर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा एडीजीपी अलोककुमार यांनी दिला.

एकंदर सीमाप्रश्नावरील उद्याची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव वा इतरत्र कोणीही गोंधळ घालायचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा एडीजीपी अलोककुमार यांनी दिला आहे.

Tags:

adgp-alok-kumar-warn-to-mes/