Agriculture

रिंग रोडच्या विरोधात भव्य चाबूक मोर्चा; बेळगावात भूमीपुत्राचा एल्गार !

Share

‘रद्द करा, रद्द करा रिंग रोड रद्द करा’, ‘शेती आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची’ अशा गगनभेदी घोषणा देत बेळगावात आज भूमिपुत्रांनी प्रस्तावित रिंग रोडच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौकातून भव्य चाबूक मोर्चा काढण्यात आला.


बेळगाव तालुक्यातील ३४ गावांची शेकडो एकर सुपीक जमीन प्रस्तावित रिंग रोडसाठी संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारने प्रक्रिया सुरु केली आहे. या रिंग रोडला बेळगाव तालुक्यातील अनेक गावातून विरोध करण्यात येतोय.

या रिंग रोडच्या विरोधात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष, शेतकरी व अन्य संघटनांच्या माध्यमातून हजारो भूमिपुत्रांच्या सहभागाने आज सोमवारी भव्य चाबूक मोर्चाचे आयोजन केले आहे. धर्मवीर संभाजी चौकातून या मोर्च्याला प्रारंभ झाला आहे.

बेळगाव तालुक्यातील बहुतेक सर्व गावातून इतकेच नव्हे तर खानापूर तालुक्यातील गावोगावचे शेतकरी, रयत संघटनांचे पदाधिकारी व सदस्य या मोर्चात सहभागी झाले आहेत. त्याशिवाय अनेक समाजसेवी संघटना, बुद्धिजीवी, विचारवंतांनीही यास पाठिंबा दर्शविला आहे.

हातात चाबूक घेऊन शेतकरी मोर्चात आहेत. लहान मुलेदेखील शेतकऱ्याच्या वेशात हातात चाबूक घेऊन आपल्या भवितव्याशी खेळण्याचा सरकारला अधिकार नाही असे ठणकावत सांगत मोर्चात सहभागी झाली आहेत.

विशेष म्हणजे तालुक्यातील अनेक गावातून रणरागिणीही मोठ्या लक्षणीय संख्येने मोर्चात सहभागी झाल्या आहेत. धनगरी ढोल पथके, लोक कलाकारांची पथकेही मोर्चासोबत आहेत.
कॉलेज रोडवरून जिल्हाधिकारी कार्यालयावर चाबूक मोर्चा धडक देणार आहे. घोषणा देत मोर्चा काढण्यात येत आहे.

Tags:

AGAINST RINGROAD belgaum CHABUK farmerprotest MORCHA