महाराष्ट्र आणि कर्नाटक मुख्यमंत्रांच्या वक्तव्याचे पडसाद दोन्ही राज्यात उमटत आहेत . बेळगावजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून धरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळून करवेच्या नारायण गौडा गटाने निदर्शने केली .
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांच्या नेतृत्वाखाली महांतेश नगरजवळ राष्ट्रीय महामार्ग रोखून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निषेध मोर्चा काढला आणि त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले . यावेळी करवे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली
महाराष्ट्र पासिंगच्या मालवाहू वाहनावर करवे कार्यकर्त्यांनी अचानक हल्ला करून त्यावर काळी शाई फेकली . आणि वायपर तोडून टाकले .

करवे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी यांनी यावेळी बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील कर्नाटकच्या बसेसवर दगडफेक करणे आम्ही खपवून घेणार नाही. काय करायचे ते आम्हाला माहित आहे. केंद्र सरकारने सीमावादात तातडीने हस्तक्षेप करावा. केंद्रीय व्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्या महाराष्ट्र सरकारवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारविरोधात लढण्याऐवजी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींविरोधात लढावे लागणार आहे. येथील आमदार-खासदारांच्या घरासमोर ठीय्या आंदोलन करू . आगामी निवडणुकीत घरोघरी जाऊन कन्नडिगांना जाणीव करून देणार आहोत. जे कन्नडिगांच्या हिताचे रक्षण करतात, राज्य आणि भाषेच्या बाजूने उभे असतात त्यांनाच आम्ही मतदान करू, असा इशारा दीपक गुडगनट्टी यांनी दिला.

राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. पुणे-बेंगळुरूकडे जाणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली होती. डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


Recent Comments