अंकली-रायबाग ते चिक्कोडी तालुक्याला जोडणाऱ्या अंकली-बावनसौंदत्ती रस्त्याच्या मध्यवर्ती भागातील पुलावरील डांबर पूर्णपणे उखडले आहे. शिवाय अनेक खड्डे पडले असून ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. खड्डे टाळताना अनेक अपघात होत आहेत.

बावनसौंदत्ती-अंकली हा रस्ता चिक्कोडी, रायबाग तालुक्याना जोडतो. बावनसौंदत्ती, जलालपूर, डिग्गेवाडी, शिवशक्ती साखर कारखाना, रायबाग शहर आणि प्रसिद्ध श्री मायाक्का चिंचली देवस्थानकडे जाणारा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरून दररोज हजारो टन ऊस चिक्कोडी साखर कारखान्याकडे नेला जातो. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये-जा करतात. रस्ता एवढा खराब असतानाही चिक्कोडी सार्वजनिक बांधकाम विभाग त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत नाही.
या भागातील जनतेच्या अनेक दिवसांच्या मागणीवरून हा पूल तत्कालीन लोकसभा खासदार प्रकाश हुक्केरी यांनी 2017 मध्ये उभारून लोकांची सोय केली होती. पुलावरील रस्ता खराब झाल्यापासून आजतागायत कृष्णा नदीला दोनदा पूर आला असून संपूर्ण डांबर उखडले आहे. परंतु संबंधित विभागाने एकदाही डांबरीकरण व दुरुस्ती केलेली नाही. त्यामुळे लोक बांधकाम विभागाच्या नावाने शंख करत आहेत. विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन पूल आणि रस्त्याची दुरुस्ती करून वाहनधारक आणि नागरिकांची सोय करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments