बेळगावजवळील किटवाड धबधब्यात मोठी दुर्घटना घडली असून पाय घसरून पडून बेळगावातील चार तरुणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेने बेळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यात ही दुर्घटना घडली. बेळगावहुन काही तरुणींचा ग्रुप किटवाड फॉल्स येथे सहलीला गेला होता. यावेळी मोबाईलवर सेल्फी घेत असताना पाच तरुणी घसरून पडल्या. पाच तरुणींपैकी चौघींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असून एका तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. बेळगावच्या उज्वलनगर अथवा क्रॉस येथील असमिया महंमदगौस मुजावर (17), अनगोळ झटपट कॉलनीतील कुदसिया हासन पटेल (20), रुकसार युसूफ बिस्ती (20) आणि तस्मिया अशपाक बिस्ती (20) या दुर्दैवी तरुणींचा मृत्यू झाला. या दुर्घटनेने बेळगावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, सर्व मृत तरुणींचे मृतदेह बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. यावेळी मुले गमावलेल्या कुटुंबीयांचे दुःख शिगेला पोहोचले.
दरम्यान, या घटनेसंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना डीसीपी रवींद्र गडादी यांनी मृत तरुणींचे मृतदेह बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात आणण्यात येत असल्याचे सांगितले. मदरशातील मुले महाराष्ट्रात सहलीला गेली असताना ही दुर्घटना घडली आहे, ज्यांना पोहता येत नाही त्यांनी पाण्यात उतरू नये. सोबत कोणी मोठा असेल तर त्यानी त्यांची जबाबदारी घेतली पाहिजे. लहान मुलांना काहीच कळत नाही. अशा घटना खाणींमध्ये वारंवार घडत आहेत. सुरक्षित ठिकाणी सहलीला गेले पाहिजे, धोकादायक ठिकाणी कोणी जाऊ नये. पालकांनी आपल्या मुलांची थोडी काळजी घेतली पाहिजे. ते कुठे जातात, काय करतात, त्यांना काही वाईट सवयी आहेत का..? त्यांचे मित्र कोण आहेत हे तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. मदरशातून कोणीही गेले नसल्याचे ते सांगत आहेत. त्याचाही आम्ही तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी आमदार फिरोज सेठ, अंजुमन इस्लामचे अध्यक्ष राजू सेठ व इतर नेत्यांनीही जिल्हा रुग्णालयात जाऊन मृत तरुणींच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी मौलाना मुस्ताक शेख यांनी माहिती देताना सांगितले की, आयशा आपा यांच्या माळी गल्ली बेळगाव येथील अरबी शिकवणीला या मुली जात होत्या. त्यापैकी 20 मुस्लिम मुली दिल्लीला अरबी भाषेचे प्रशिक्षण घेण्यासाठी जाणार होत्या. सहलीला जायचे असल्याने किटवाड येथील धबधब्यात आनंद लूटण्यासाठी गेले असता ही दुर्घटना घडली. आमच्या तरुण मुलांनी त्या ठिकाणी जाऊन सगळ्यांना घेऊन आली आहेत. ही घटना सर्वांसाठीच धक्कादायक असल्याची माहिती त्यांनी दिली.
एकंदर, भविष्याची मोठी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणींचा असा दुःखद अंत व्हावा ही खरोखरच मोठी शोकांतिका आहे.


Recent Comments