Banglore

दगडफेकीबाबत महाराष्ट्राशी केलीय चर्चा : मुख्यमंत्री बोम्मई

Share

देशात समान नागरी संहिता लागू करण्याची गरज आहे. यावर आम्ही गांभीर्याने विचार करत असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

विधानसौधसमोर आज संविधान दिनानिमित्त राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी. आर. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, केंद्रात भाजपच्या जाहीरनाम्यात समान नागरी संहितेच्या अंमलबजावणीचा उल्लेख करण्यात आला आहे. विविध राज्यांमध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. कर्नाटकातही आम्ही समान नागरी संहितेच्या सर्व पैलूंचा अभ्यास करत असून, त्यानंतर याबाबत निर्णय घेऊ, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेसवर झालेल्या दगडफेकीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांनी प्रतिक्रिया दिली. मी यासंदर्भात महाराष्ट्र सरकारशी बोललो आहे. आज गृहमंत्री आणि डीजी-आयजीपी तिथल्या समकक्ष अधिकाऱ्यांशी चर्चा करतील. आमच्या बसेसचे कोणतेही नुकसान होऊ नये, असे आम्ही कळविले आहे. दोन्ही राज्यांमध्ये शांतता आणि सलोखा राखावे असे सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

चिलुमे प्रकरणात दोन आयएएस अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत बोलताना, याची खुली चौकशी करण्यासाठी सरकार तयार आहे. त्यामुळेच आम्ही ते प्रकरण तपासासाठी सोपवले आहे. अनेकांना अटकही करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या चौकशीचे स्वागत करतो, असे ते म्हणाले. अधिकारी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. निवडणूक आयोग रद्द केलेल्या मतदार कार्डांची सुधारणा करत आहे. अयोग्यरित्या रद्द केले असल्यास, दुरुस्त केले. दोन मतदारसंघात नाव असल्यास ते मतदार कार्ड रद्द करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

बेळगावातील सुवर्णसौध येथे कित्तूर चेन्नम्मा आणि संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी आम्ही यापूर्वीच आदेश दिलेला आहे. हिवाळी अधिवेशनात पुतळ्यांच्या उभारणीसाठी पायाभरणी करू, असे आश्वासन मुख्यमंत्री बोम्मई यांनी दिले.

Tags:

bangalore-cm-bommaih/