Athani

अथणीत रस्ता दुरुस्तीसाठी रस्त्यात होमहवन करून आंदोलन

Share

मंदिरात आणि घरात प्रवेश करताना होम हवन केले जात असल्याचे आपण पाहिले आहे, परंतु गेल्या 18 वर्षांपासून रस्ता दुरुस्त केला नसल्याच्या निषेधार्थ अथणीत ग्रामस्थ आणि काँग्रेस नेत्यांनी होम हवन करून अभिनव निषेध केला आहे. रस्त्याच्या मधोमध होमकुंड पेटवून रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आमदार आणि सरकारला सद्बुद्धी द्यावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.

होय, बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील सुट्टटी गाव ते कोकटनूर गावापर्यंतचा अंदाजे नऊ किलोमीटरचा रस्ता गेल्या 18 वर्षांपासून पूर्णपणे नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे गरोदर महिला, आजारी व्यक्ती आणि शाळकरी बालके, वाहनचालकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकारी आणि आमदारांना असंख्यवेळा निवेदने, अर्ज देऊनही काहीच उपयोग झालेला नाहीय. त्यामुळे काँग्रेसचे नेते गजानन मंगसुळी यांच्या नेतृत्वाखाली सुट्टटी ग्रामस्थांनी रस्त्याच्या मधोमध होम हवन करून, रस्ता लवकरात लवकर विकसित होण्यासाठी देवाकडे प्रार्थना केली आणि अभिनव आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले.

यावेळी काँग्रेसचे नेते गजानन मंगसुळी म्हणाले की, अथणी तालुक्यात अनेक ठिकाणचे रस्ते अनेक वर्षांपासून अत्यंत खराब, नादुरुस्त अवस्थेत आहेत. त्यामुळे वाहनचालक खूप त्रस्त आहेत. भाजप सरकार 100 टक्के पूर्णत: भ्रष्टाचारात बुडून गेल्याने या भागात रस्ते बांधण्यात आलेले नाहीत, देव त्यांना सद्बुद्धी देवो, यासाठी रस्त्याच्या मधोमध होमहवन केले. बाइट
एकंदर, नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीकडे सरकारी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ अथणीत काँग्रेस नेत्यांनी अभिनव आंदोलन केले आहे. किमान आता तरी संबंधितांचे डोळे उघडणार का याची प्रतीक्षा करावी लागेल.
राकेश मैगुर, आपली मराठी, अथणी

Tags:

protest-for-road-development/