कचरा टाकताना दुचाकीला हात लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगावातील भाग्यनगर येथे घडली आहे.
होय, कचरा टाकण्यास जाताना दुचाकीला हात लागल्याच्या अतिशय किरकोळ कारणावरून एका युवकाला चौघांनी प्राणघातक हल्ला केला. दगडाने कपाळावर मारल्याने या युवकाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या डोळ्यांनाही इजा झाली आहे. आशिष शेणवी रा. भाग्यनगर, बेळगाव असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.

भाग्यनगर पहिला क्रॉस येथील दत्त मंदिराजवळ काल, मंगळवारी रात्री आशिष शेणवी कचरा टाकण्यासाठी जात होता. यावेळी चुकून त्याचा हात रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला लागला. यावरून दुचाकीस्वाराने त्याच्याशी भांडण करून आपल्या मित्रांना बोलावून घेतले. त्यानंतर पुन्हा मोठा वाद झाला. त्यातच चौघांनी आशिषला बेदम मारहाण केली. एकाने रस्त्यावर पडलेला दगड उचलून आशिषच्या कपाळावर जोराने मारला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. यावेळी स्थानिक लोक जमा झाल्याने हल्लेखोर युवकांनी आपल्या दुचाकी घटनास्थळीच टाकून पोबारा केला. या प्रकरणी टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झाला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.


Recent Comments