स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या निषेधार्थ चक्क रस्त्याच्या मधोमध मृतदेह ठेवून धरणे धरल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील नणदीवाडी गावात घडली.

होय, चिक्कोडी तालुक्यातील नणदीवाडी गावात स्मशानभूमीच्या जाण्यास रस्ता नसल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत आहे. शिवाय मेल्यानंतरही कष्ट संपत नाहीत याचा प्रत्यय येत आहे. गावातील एकसंबी नामक कुटुंबाने रुद्रभूमीकडे जाणाऱ्या मार्गावरून आक्षेप घेतला आहे. त्याशिवाय रुद्रभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर कुंपण उभारून तो बंद केला आहे. दरम्यान, नणदीवाडी गावातील सुधाकर महादेव नायक यांचे आज सकाळी आजाराने निधन झाले. त्यावेळीही स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थ आणि मृत नायक यांच्या कुटुंबीयांनी सुधाकर नायक यांचा मृतदेह एकसंबा-चिक्कोडी रोडवर मधोमध ठेवून भजन कीर्तन करत निषेध केला. रस्त्यावर मृतदेह ठेवून रस्ता रोको केल्याने या ठिकाणी काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थांनी न्यायाची मागणी करत जोरदार घोषणाबाजीही केली.
या निदर्शनांची माहिती मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल झालेल्या सदलगा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. सदलगा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.


Recent Comments