Banglore

सरकारी मालमत्ता लोकांच्या सेवेसाठी वापरावी : मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

Share

: बीबीएमपी आणि बीडीएच्या सरकारी मालमत्ता सार्वजनिक सेवेसाठी वापरली जावी. व्यावसायिक संकुलांसारख्या सरकारी मालमत्ता केवळ व्यावसायिक उपक्रमांसाठीच राखीव नसून सरकारी कार्यालये आणि सार्वजनिक सेवेसाठीही राखीव असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

बेंगळुरूच्या बोमनहळ्ळी विधानसभा मतदारसंघात केआरआयडीएलद्वारे बांधण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते आज भूमिपूजन करण्यात आले.
यानंतर बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, बेंगळूर हे चारही दिशांनी वेगाने वाढणारे शहर आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी, अभियंते आणि सहआयुक्तांची नियुक्ती करण्यात येत आहे. मात्र या अधिकाऱ्यांना जागेअभावी मुख्य कार्यालयातच कर्तव्य बजावावे लागत आहे. दरवर्षी सरकारी कार्यालयांच्या बांधकामावर सरकार पैसे खर्च करते. कधीकधी जागेची कमतरता असते. सरकारच्या अखत्यारीतील केआरआयडीएल संस्थेच्या माध्यमातून आज उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाच्या मॉडेलवर व्यावसायिक उपक्रम आणि सरकारी कार्यालये चालू शकतील अशा अनेक भागात इमारती बांधण्याचे निर्णय घेतले जातील. ते म्हणाले की, विजापूर आणि मंगळुरू येथेही असाच प्रकल्प हाती घेण्यात आला असून, हा प्रकल्प केआरडीएल संस्थेने राज्यातील उर्वरित जिल्हा केंद्रांमध्ये उभारावा.

कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळ स्वतःची मालमत्ता निर्माण करत आहे आणि स्वतःच्या मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे. व्यापारी संकुलही सरकारची मालमत्ता बनते. बंगळुरूमध्ये व्यापारी संकुल बांधल्यास या सरकारी मालमत्तेतून दरवर्षी ९१ कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. अशा इमारती खासगी भागीदारीत बांधल्या गेल्या तर सरकारला फायदा होणार नाही.

बंगळूर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बंगळुरमध्ये दररोज मोठ्या संख्येने लोक येतात. दिल्लीप्रमाणेच, बंगळुरलाही मोठ्या संख्येने परदेशी लोक भेट देतात. दररोज 5000 हून अधिक नवीन वाहने रस्त्यावर येतात. शहराची लोकसंख्या १.३० कोटी आणि वाहन संख्या १.५६ कोटी आहे. आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये नेहमीच गर्दी असते. गर्दीच्या या आव्हानाचा सामना करण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे. 12 उच्च घनतेच्या रस्त्यांच्या बांधकामासाठी 280 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. देशातील विविध प्रमुख शहरांना बंगळुरूला जोडणारे हे रस्ते आहेत. नगरोत्थान योजनेंतर्गत रस्तेबांधणी मंजूर झाली आहे. बंगळुरूच्या विकासासाठी विविध योजनांतर्गत सुमारे 8000 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्थापित करण्यासाठी विशेष आयुक्तांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष परिवहन आयुक्त कार्यालय आणि नवीन वाहतूक पोलीस ठाणी स्थापन करण्यात येणार आहेत. बंगळुरू शहराच्या आयुक्तांना जास्त रहदारी असलेल्या भागात नवीन वाहतूक पोलिस स्टेशन बांधण्यासाठी मंजुरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत असे बोम्मई यांनी सांगितले.

बोम्मनहळ्ळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार सतीश रेड्डी हे केवळ लोकप्रिय आमदारच नाहीत तर उपयुक्त आमदारही आहेत. ते लोकांच्या समस्या समजून घेतात, लोकांच्या प्रश्नांना उत्तर देणारा नेता आहेत अशी स्तुती त्यांनी केली.
यावेळी आमदार सतीश रेड्डी, केआर आयडीएलचे अध्यक्ष एम. रुद्रेश, पंचायत राज विभागाच्या एसीएस उमा महादेवन, केआर आयडीएलचे एमडी एम. जी. हिरेमठ आदी अधिकारी उपस्थित होते.

Tags: