Belagavi

स्वातंत्र्यप्राप्तीत क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. लाड यांचे मोठे योगदान : प्रसाद कुलकर्णी

Share

सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने ब्रिटिश सत्तेला हादरे देणाऱ्या क्रांतिकारकांमुळेच ब्रिटिशांना स्वातंत्र्यलढ्याची दखल घ्यावी लागली. अशा क्रांतिकारकांप्रमाणे क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. लाड यांचे योगदान मोठे होते असे प्रतिपादन इचलकरंजी येथील प्रबोधन प्रकाशन ज्योती संस्थेचे संपादक प्रसाद कुलकर्णी यांनी केले.

बेळगावातील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. लाड जन्मशताब्दीनिमित्त ज्योती महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात विशेष व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे आमदार अरुण अण्णा लाड, अध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील व मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले, 1916मध्ये महात्मा गांधी भारतात आले. त्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेत त्यांनी वर्णद्वेषाविरोधात केलेल्या चळवळीमुळे ते जगभर प्रसिद्ध झाले होते. त्याआधीपासूनच भारतात ब्रिटिश राजवटीविरोधात उठाव सुरु झाले होते. मात्र जुलमी ब्रिटिशांनी हरेक मार्ग अवलंबून ते चिरडून टाकले. त्यामुळे सशस्त्र क्रांतीचा विचार पुढे आला आणि रुजला. या सशस्त्र चळवळीत साताऱ्यात प्रति सरकारची स्थापना झाली. या लढ्यात क्रांती अग्रणी डॉ. जी. डी. लाड यांचे योगदान मोठे होते. अशा अनेक महान क्रांतिकारकांनी देशाला मिळवून दिलेले स्वातंत्र्य जपणे, देश एकसंघ ठेवणे ही आम्हा सर्वांची सामुदायिक जबाबदारी असल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील होते. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे सचिव प्रा. विक्रम पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील यांनी प्रमुख पाहुणे आमदार अरुण अण्णा लाड आणि प्रसाद कुलकर्णी यांचे स्वागत केले. प्रा. सुरेश पाटील यांनी परिचय करून दिला. भाऊराव काकतकर कॉलेजचे प्राचार्य एस. एन. पाटील यांनी आभार मानले. यावेळी निवृत्त प्राचार्य आनंद मेणसे, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या कॉलेज आणि संस्थांचे प्राध्यापक, शिक्षक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

south-maharashtra-education-board-amrit-mahotsav-celebration/