आरोग्य आणि कल्याण केंद्र विभागातील अधिकाऱ्यांना पदोन्नती, सेवेत कायम करणे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 18 नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या डीएचओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे ऑल कर्नाटक स्टेट कम्युनिटी हेल्थ एम्प्लॉईज असोसिएशनचे अध्यक्ष आनंद शिगेहळ्ळी यांनी सांगितले.
बेळगावात आज, बुधवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी समुदाय आरोग्य केंद्रांच्या अधिकाऱ्यांची आधीच नियुक्ती केली आहे. मात्र अनेकवेळा सरकारकडे दाद मागूनही ते आम्हाला सेवेत कायम करत नाहीत. आपण प्रामुख्याने ग्रामीण स्तरावर सेवा केली पाहिजे. परंतु सरकार डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून आमचा वापर करत आहेत. त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी नेमण्याची काय गरज होती, असा सवाल त्यांनी केला.
राज्यभरातील काही आरोग्य आणि कल्याण केंद्रांमध्ये मार्गदर्शक तत्त्वांनुसार योग्य औषधे उपलब्ध नाहीत. याबाबत राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊनही प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आमच्या विविध मागण्या पूर्ण कराव्यात या मागणीसाठी 450 सामुदायिक आरोग्य अधिकारी 18 नोव्हेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक धरणे देणार आहेत. त्यानंतरही आमची मागणी मान्य न झाल्यास सुवर्णसौध येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनावेळी उग्र आंदोलन करण्याचा निर्णय आमच्या प्रदेश संघटनेकडून घेण्यात आल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंद शिगेहळ्ळी यांनी स्पष्ट केले.
बसवराज इंगळी, अमृता मज्जगी, मल्लिकार्जुन सक्री, लक्ष्मी कन्नूर, कुमार कुंभार आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments