निप्पाणी तालुक्यातील कारदगा गावात येत्या 27 नोव्हेंबर रोजी 25वे रौप्यमहोत्सवी कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार असल्याचे साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशिद यांनी सांगितले.
कारदगा गावात पत्रकार परिषदेत बोलताना काशिद यांनी साहित्य संमेलनाची रूपरेखा स्पष्ट केली. ते म्हणाले की, या रौप्य महोत्सवी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कार्यक्रम म्हणजे सीमाभागातील साहित्य रसिकांसाठी पर्वणीच आहे. साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर पत्रके वाटप, व्यासपपीठाची उभारणी, साहित्यिक व मान्यवरांच्या भेटी, देणगी संकलन असे विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.

27 नोव्हेंबर रोजी भरणाऱ्या कारदगा ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ प्रथेप्रमाणे ग्रंथदिंडीने होणार आहे. पुस्तकांचे प्रकाशन, साहित्यिकांची व्याख्याने, काव्यवाचन, परिसंवाद आणि मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश काशिद यांनी केले.
यावेळी पत्रकारांनीही आपले विचार मांडले.
रावसाहेब सावंत यांनी स्वागत केले. बाळासाहेब नाडगे, महादेव दिंडे, महावीर पाटील, भगवंत कुलकर्णी, सदाशिव खोत, रंगराव बन्ने आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.


Recent Comments