हुबळी येथे पोलीस ठाण्याजवळच क्षुल्लक कारणावरून एकावर चाकूने वार करून खून करण्यात आला. किम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना जखमी युवकाचा मृत्यू झाला. मारेकऱ्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी करत संतोषचे नातेवाईक आणि जंगलीपेठ येथील रहिवाशांनी हुबळी येथील कसबापेठ पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली.
जुन्या हुबळी येथील दुर्गदबैल सर्कलजवळ संतोष मुरगोड नामक युवकावर शिवा नामक आरोपीने पोटात चाकूने भोसकल्याने संतोष मुरागोड हा गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारांसाठी हुबळी येथील किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खून करून फरार असलेल्या शिवा नावाच्या आरोपीला जेरबंद करण्यात कसबापेठ पोलिसांना यश आले आहे.
घटनेची माहिती मिळताच जुन्या हुबळी स्टेशनच्या पोलिसांनी किम्स हॉस्पिटलला भेट दिली आणि चाकू हल्ल्याबाबत अधिक माहिती गोळा केली.
मृत संतोषचे सासरे भीमशी जोकाटे यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, शिवा नावाचा तरुण शहरात पेट्रोल चोरी करत असे. परिसरात त्याचा लोकांना मोठा उपद्रव होतो. त्यामुळे याबाबतची तक्रार करण्यासाठी आम्ही कसबापेठ पोलीस ठाण्यात गेलो होतो. मात्र पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेत काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे अशी घटना घडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, खुनाचे नेमके कारण पोलीस तपासताच स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी कसबापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, दुर्गदबैल सर्कलजवळ संतोषच्या हत्येचा निषेध करत आणि मारेकऱ्याला कठोर शिक्षा करण्याची मागणी करत संतोषचे नातेवाईक आणि जंगलीपेठ येथील रहिवाशांनी हुबळी येथील कसबापेठ पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. संतोषचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवून हत्येचा आणि पोलिसांच्या दुर्लक्षाचा निषेध करण्यात आला. यावेळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी निदर्शनस्थळी येऊन निदर्शकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
Recent Comments