क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा हे कोणा एका समाजापुरते मर्यादित नाहीत. आम्ही त्यांना मर्यादित करण्याचे काम करत आहोत. असे होऊ नये. सर्व महापुरुष हे कोणत्याही जाती, भाषा, राज्यापुरते मर्यादित राहू नयेत, असे आवाहन बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केले.
बेळगावातील अनगोळ गावातील तलावाच्या काठावर आज, रविवारी आमदार अभय पाटील यांच्या हस्ते स्थानिकांच्या उपस्थितीत क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची कोनशिला बसवून भूमिपूजन करण्यात आले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आ. अभय पाटील म्हणाले की, तलावाच्या काठावर क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा उभारावा हे अनगोळच्या रहिवाशांचे स्वप्न होते. याबाबत ग्रामस्थांनी बैठक घेऊन सर्वानुमते रायण्णा यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी येथे आधी रस्ता तयार केला आहे. तलावाच्या काठावर पुतळा बसविण्यात येणार असून, या जागेचे सुशोभीकरण करण्यासाठी कारंजे, दिवाबत्ती आणि पेव्हर्स बसविण्यात येणार आहेत. यासाठी एक कोटी रुपयांचे अनुदान यापूर्वीच जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना सिद्धार्थ होसमनी यांनी, गावकऱ्यांच्या हाकेला मान देऊन क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे भूमिपूजन अभय पाटील यांनी केले याचा, आम्हा सर्वांना खूप आनंद झाला, सर्व जातीचे नागरिक आनंदाने या समारंभात सहभागी झाले आहेत असे त्यांनी सांगितले.
सिद्धार्थ होसमनी, यल्लाप्पा पुजारी, प्रकाश पुजारी, वसंत दळवाई, शिवाजी शहापूरकर, शिवराज होळीमठ, निखिल अंगडी, दीपक सोमण्णाचे आदी यावेळी उपस्थित होते.


Recent Comments