बेळगांव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे महेश फाउंडेशनच्या वंचित मुलांसाठी नवीन कौशल्यावर आधारित वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.
बेळगांव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांनी महेश फाऊंडेशनच्या कणबर्गी येथील महेश फाऊंडेशन येथे वंचित मुलांसाठीच्या कौशल्यावर आधारित क्लासरूमचे समारंभपूर्वक उद्घाटन केले. महेश फाऊंडेशन गेल्या १४ वर्षांपासून एचआयव्ही पॉझिटिव्ह मुलांची आणि वंचित समाजातील मुलांची सेवा करत आहे आणि त्यांना मोफत शिक्षणासोबतच विविध सुविधा पुरवत आहेत. महेश फाऊंडेशनचे ’उत्कर्षा शाळा आणि शिक्षण केंद्र’ २०१८ मध्ये सुरू झाले आणि सध्या २७५+ वंचित मुलांना मोफत कौशल्य-आधारित शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून, उत्कर्षा लर्निंग सेंटरने मुलांमधील कौशल्ये वाढवण्यासाठी कला आणि हस्तकलेचा अवलंब केला आहे. म्हणून, महेश फाउंडेशनने कौशल्य-आधारित वर्गाची स्थापना केली ज्याचे उद्घाटन बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सदस्यांनी केले. या वर्गाचा दररोज 600+ मुलांना फायदा होईल कारण हे उत्कर्षा लर्निंग सेंटरच्या मुलांसह जवळच्या सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या वंचित मुलांना कौशल्य शिकवेल अशी माहिती यावेळी देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना हेमेंद्र पोरवाल म्हणाले की, महेश फाऊंडेशनने वंचित मुलांच्या जीवनात बदल घडविणारा समाजकार्याचा वसा एका लहान घरातून घेतला तेव्हापासून मी त्यांच्या कार्याशी अनेक कारणांनी जोडला गेलो आहे. गेल्या १४ वर्षांचा हा खडतर प्रवास करुन आज एक उत्तम वास्तू आणि एक उत्तम शाळा त्यांनी उभी केली आहे अशी शाळा मी आजपर्यंत कुठेही पाहिली नाही आणि या सर्व सुविधा कुठलेही शुल्क न आकारता पुरविल्या जातात याचे मला आश्चर्य आणि कौतुक वाटते. महेश फाऊंडेशनचे हे कार्य उल्लेखनीय आहे.” अशी प्रशंसा त्यांनी केली. बाईट
बेळगांव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने महेश फाऊंडेशनमध्ये त्यांची मासिक बोर्ड बैठक आयोजित केली होती, या सोबतच त्यांनी महेश फाऊंडेशनमध्ये कौशल्यआधारित वर्गखोल्यांचे उद्घाटन केले.
“महेश फाऊंडेशनसाठी बेळगांवातील लोक आणि बेळगांवातील उद्योगसमूहांनी दिलेला पाठिंबा आणि सहकार्य अविस्मरणीय आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळेच आतापर्यंत हे सर्व शक्य झाले आहे. चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे मंडळ तसेच बेळगांवातील सर्व उद्योगसमूहांचे आम्ही आभारी आहोत, ज्यांनी आम्हाला सदैव साथ दिली आहे,” असे महेश फाऊंडेशनचे संस्थापक महेश जाधव यांनी सांगितले. यावेळी कै. सुरेश हुंदरे यांची आठवण महेश जाधव यांनी काढली. सुरेश हुंदरे हे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे माजी अध्यक्ष होते तसेच ते महेश फाऊंडेशनचेही माजी अध्यक्ष होते, सुरेश हुंदरेसर हे आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आम्ही काम करत आहोत असेही यावेळी महेश जाधव यांनी सांगितले.

यावेळी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे सचिव स्वप्नील शहा यांनी महेश फाउंडेशनच्या यशस्वी आणि निस्वार्थ प्रवासाबद्दल अभिनंदन केले.
बेळगांव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल, वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी, द्वितीय उपाध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, सचिव स्वप्नील शहा व इतर पदाधिकारी तसेच महेश फाउंडेशनमधील मुले, कर्मचारी, शिक्षक व स्वयंसेवक उपस्थित होते.


Recent Comments