Belagavi

बेळगावात जारकीहोळी यांच्या निषेधार्थ भाजपचा भव्य मोर्चा, निदर्शने

Share

केपीसीसीचे कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळी यांनी ‘हिंदू’ या शब्दावर केलेल्या वक्तव्यावरून आता मोठा वाद निर्माण झाला आहे. प्रदेश भाजपने सतीश जारकीहोळी यांच्या निषेधार्थ पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातही आज भाजपच्या वतीने भव्य निषेध मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.

होय, केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी नुकतेच निपाणी येथे मानव बंधुत्व वेदिकेच्या मेळाव्यात ‘हिंदू’ या शब्दाचा पर्शियन भाषेत ‘अश्लील’ असा अर्थ होतो असे विधान केले. त्यावरून सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे नेते मैदानात उतरले आहेत. बेळगावच्या राणी चन्नम्मा चौकामध्ये सतीश जारकीहोळी यांची प्रतिकृती हातात धरून त्यांच्या धिक्काराच्या घोषणा देत भाजप नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. सतीश जारकीहोळी यांचे हिंदू धर्माबाबत केलेले वक्तव्य मागे घेण्याच्या मागणीसाठी बेळगाव शहर व ग्रामीण जिल्ह्यातील भाजपच्या वतीने आयोजित आंदोलनात त्यांनी मानवी साखळी करून रास्ता रोको केला. यावेळी संतप्त भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सतीश जारकीहोळी यांच्या प्रतिकृतीचे दहन करून निषेध नोंदविला.

यावेळी बोलताना भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील यांनी, सतीश जारकीहोळी यांनी अवमानकारक वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जगज्योती बसवेश्वर, धर्मवीर संभाजी महाराज, महर्षी वाल्मिकी आणि सर्वोच्च न्यायालयाचाही अवमान केल्याचे सांगितले. हिंदवी स्वराज्य उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून तुम्ही पुढच्या निवडणुकीत घरी जाण्यासाठी तिकीट बुक केले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी, सतीश जारकीहोळी यांनी आपल्या वक्तव्याने देशातील संत तुकाराम, संगोळ्ळी रायण्णा, महात्मा बसवण्णा, स्वामी विवेकानंद, महर्षी वाल्मिकी अशा अनेक महापुरुषांचा अपमान केलाय. हे सर्व महापुरुष हिंदू धर्मासाठी, या देशासाठी लढले. ते कधीही हिंदुत्वाबद्दल नकारात्मक बोलले नाही, तर हिंदुत्वाचा विकास करण्याचे काम केले. अशा महापुरुषांबद्दल कमी ज्ञान दाखवणे हा फार मोठा गुन्हा आहे. समाजात एकमत निर्माण करण्याचे काम तर सोडाच, स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही भाषा, धर्म, जातीच्या नावावर समाजात फूट पाडण्याचे काम काँग्रेस करत आली आहे. त्याची प्रतिकृती आज आपण बेळगाव जिल्ह्यात पाहत आहोत. इसिस बाहेरची असेल, पण त्यापेक्षाही मोठे षडयंत्र आज बेळगावात सुरू झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.

उत्तरचे आमदार अनिल बेनके म्हणाले की, काँग्रेस नेहमीच हिंदुविरोधी वक्तव्ये करत आली आहे. सतीश जारकीहोळी यांनी हिंदूंबद्दल जे सांगितले ते अश्लील आहे. ते कुठून आले असे विचारले तर ते विकिपीडिया आणि गुगल म्हणतील. गुगल आणि विकिपीडियावर जाऊन सतीश जारकीहोळी यांची माहिती तपासली तर ते हिंदू म्हणून येते. जात वाल्मिकी म्हणून येते. रामायण लिहिणारे महर्षी वाल्मिकी हे देखील हिंदूच होते हे आपण विसरू नये असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी बोलताना कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डगौडर म्हणाले, हिंदुस्थानात हिंदूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे अनुभवी आमदार सतीश जारकीहोळी यांच्या विधानावर अनेकजण भाष्य करत आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागून देशातील हिंदूंच्या भावनांची कदर केली पाहिजे. तसे न केल्यास समाजाला तुम्हाला योग्य धडा शिकवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

यानंतर भाजपच्या नेत्यांनी चन्नम्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढून सतीश जारकीजोळी यांच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले. यावेळी अपर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले. यावेळी राज्यसभा सदस्य इरण्णा काडादी, ग्रामीण भाजप जिल्हाध्यक्ष संजय पाटील, माजी परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, प्रदेश प्रवक्ते एम. बी. जिरली, ग्रामीण मंडल अध्यक्ष धनंजय जाधव यांच्यासह अनेक नेते व हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी निदर्शनात सहभाग घेऊन सतीश जारकीहोळी यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.

Tags:

belgaum bjp mass protest against satish jarkiholi