मादिग समाजाला अंतर्गत आरक्षण मिळावे तसेच मादिग समाजातील लोकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने भव्य बाईक रॅली आयोजित करण्यात आली असून या माध्यमातून सरकार समोर आपल्या मागण्या मांडण्यात येणार आहेत, अशी माहित बेळगावमधील उद्योजक आणि स्थानिक वृत्तपत्राचे संपादक प्रशांत ऐहोळे यांनी दिली.
बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सदाशिव आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी मादिग समाजातील सर्व संघ संस्थांच्या माध्यमातून सलग २० दिवस उत्तर कर्नाटकातील विविध भागात २००० किलोमीटर पर्यंतच्या पल्ल्याची बाईक रॅली आयोजित करण्यात आली असून सदर रॅलीच्या माध्यमातून उत्तर कर्नाटकातील १३ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आणि गावोगावी जागृती करण्यात येणार आहे.
तसेच कर्नाटक राज्य मादिग संघाचे अध्यक्ष मुत्तन्ना बेन्नूर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, अनुसूचित जातीतील एकूण १०१ पोटजातींमधील लोकसंख्येनुसार अंतर्गत आरक्षण दिले जावे, मागासवर्गाप्रमाणेच आपल्या समाजालाही अंतर्गत आरक्षण लागू करावे, तसे न झाल्यास बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
डीएसएस राज्य अध्यक्ष चंद्रकांत काद्रोळ्ळी बोलताना म्हणाले, आपल्या समाजाला अंतर्गत आरक्षण मिळावे या मागणीसाठी २०१७ साली आंदोलन करण्यात आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे आरक्षणाची घोषणा करतील अशी आशा होती, मात्र अंतिम क्षणी ती आशादेखील खोटी ठरली. सध्याच्या सरकारने आमची मागणी मान्य करावी अन्यथा आगामी हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन छेडण्यात येईल, आणि निवडणुकीत देखील योग्य धडा शिकवला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला मादिग समाजाचे नेते सहभागी झाले होते.


Recent Comments