आपल्या समाजातील लोक मठ आणि मठाधीशांना आदर आणि सन्मान देतात. त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, हे पाहणे मठाधीशांची जबाबदारी आहे, असे मत निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर महास्वामी यांनी व्यक्त केले.
बेळगावमधील कारंजी मठाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने तसेच कन्नड राज्योत्सव आणि हनगल कुमार शिवयोगी यांच्या १५५ व्या जयंती कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. हनगल शिवयोगींप्रमाणे मठावर समाजातील जनतेच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासाची मोठी जबाबदारी आहे. यादृष्टीकोनातून कारंजीमठाकडून होत असलेल्या निरंतर कार्याचे त्यांनी कौतुक केले.
घटप्रभा केम्पय्यस्वामी मठाचे डॉ. मल्लिकार्जुन महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात बोलताना स्वामीजी म्हणाले, हनगल कुमारशिवयोगी आणि स्वामी विवेकानंद हे समकालीन होते. त्यांच्या विचारांमध्ये साम्य आहे. स्वामी विवेकानंदांच्या विचारांचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रबोधन झाले मात्र हनगल कुमार शिवयोगींचे विचार कर्नाटकात म्हणावे तितके पोहोचू शकलेली नाही. यामुळे सर्व लिंगायत समाजाने यावर विचार करून बसवेश्वरांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले महांतेश कवटगीमठ यांनी हनगल कुमारशिवयोगी यांच्या कार्याचे स्मरण करत समाजाने त्यांच्या विचारांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्य जगण्याचे आवाहन केले.
यावेळी शेगुणसी विरक्तमठाचे महंत महास्वामी यांनी “हनगल कुमार महास्वामी जीवन दर्शन’ या विषयावर प्रवचन दिले. चेन्नकवी द्यामपूर यांनी रचलेल्या हनगल श्रीकुमारेश्वर या पौराणिक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कुमार शिवयोगी यांच्या कार्याचे स्मरण करत कारंजीमठाचे गुरुसिद्ध महास्वामी म्हणाले, हनगल कुमारशिवयोगी स्वामींनी संत बसवेश्वरांच्या तत्वांचा, विचारांचा प्रसार केला. बसवेश्वरांच्या तत्वांचा प्रसार करण्यात हनगल कुमार शिवयोगी यांची महत्वाची भूमिका असल्याचे ते म्हणाले.
या कार्यक्रमास कारंजीमठाचे डॉ. शिवयोगी देव यांच्यासह असंख्य भाविकांची उपस्थिती होती. श्रीमठाच्या मातृमंडळींनी वचन प्रार्थना गायिली तर मृत्युंजय हिरेमठ यांनी स्वागत केले. ए. के. पाटील यांनी आभार मानले. तर व्ही के पाटील यांनी सुत्रसंचलन केले.


Recent Comments