Khanapur

चापगाव कुस्ती आखाड्यात चटकदार कुस्त्या ! 400 पैलवानांचा हिरीरीने सहभाग

Share

खानापूर तालुक्यातील मौजे चापगाव येथे पारंपरिक कुस्ती खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पुरुष आणि महिला गटातील भव्य कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत दोन्ही गटातील मिळून सुमारे 400 पैलवानांनी हिरीरीने भाग घेतला.

आधुनिक युगात पारंपरिक कुस्ती तालीम बंद पडण्याच्या मार्गावर असून, त्याची पुनश्च आवड निर्माण व्हावी, नवोदित पैलवानांना मार्गदर्शन देण्यासाठी, विश्वभारती कला आणि क्रीडा संघ, बेळगाव यांच्यामार्फत कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते.

राजहंसगड येथील शतायुषी 104 वर्षीय माजी पैलवान जीवाप्पा पवार यांच्या हस्ते आखाड्याचे उद्घाटन झाले. माजी पैलवान नारायण उमाण्णा कदम यांनी फोटो पूजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मारुती चोपडे होते. आखाडा कार्याध्यक्ष पुंडलिक कुराडे व खानापूर तालुका क्रीडा कार्याध्यक्ष विनोद शिवाजी गुरव यांनी मार्गदर्शन केले.

या आखाड्यात 22 किलो ते 70 किलो वजन गटातील व ओपन जोड बघून कुस्त्या लावण्यात आल्या. पैलवानांना विशेष प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. मानाच्या कड्याची कुस्ती रोहित पाटील, कंग्राळी यांनी जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. कुबेर पैलवान यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. विविध गटात झालेल्या कुस्त्यांमध्ये पैलवानांनी आपले कौशल्य दाखवत प्रतिस्पर्धी पैलवानांना अस्मान दाखवत चीत केले. चुरशीने झालेल्या कुस्त्या पाहताना प्रेक्षकांनी टाळ्या, शिट्या वाजवत पैलवानांना प्रोत्साहन दिले.

महिला पैलवानही उत्साहाने आखाड्यात सहभागी झाल्या होत्या. 400 पैलवानांनी कुस्ती आखाड्यात भाग घेतला. कड्याच्या कुस्तीला पंच म्हणून महिला पैलवान स्मिता पाटील, कंग्राळी यांनी निर्णय दिला. मूळचे चापगाव हलशीवाडीचे माजी सैनिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विश्वभारती कला क्रीडा प्रतिष्ठान बेळगावचे संस्थापक अध्यक्ष अनिल साताप्पा देसाई यांनी आभार मानले. या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

11/khanapur-chapgaon-kusti-competitation/